VIDEO: भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल, विराट-अनुष्काला बघून चाहत्यांचा जल्लोष
ऑस्ट्रेलियातला यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे.
ऑकलंड : ऑस्ट्रेलियातला यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. न्यूझीलंडमध्ये भारत ५ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत न्यूझीलंडमध्ये पोहोचला. ऑकलंड विमानतळावर या दोघांचं चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केलं. अनुष्का शर्मा भारतीय टीमसोबतच ऑकलंड विमानतळावरून बाहेर पडली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीही अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत दिसली होती. विराटनं मेलबर्नमध्ये अनुष्कासोबत ऑस्ट्रेलियन ओपन खेळणाऱ्या टेनिस स्टार रॉजर फेडररची भेट घेतली. विराटनं फेडरर आणि अनुष्कासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो व्हायरल तर झाला, पण यानंतर विराटला ट्रोलही करण्यात आलं.
अनुष्का शर्मा जेव्हा विराटसोबत भारतीय टीमच्या दौऱ्यावर जाते तेव्हा चर्चा होते. याआधी २०१४ साली भारतीय टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यामध्येही अनुष्का विराटसोबत होती. त्यावेळी दोघांचं लग्न झालं नव्हतं. त्यावेळी विराटनं पहिल्या मॅचमध्ये शतक केलं, तर दोन मॅचमध्ये अर्धशतक केलं होतं.
भारतीय टीम ऑकलंडवरून आता नेपियरला रवाना झाली आहे. बुधवार २३ जानेवारीला या सीरिजची पहिली वनडे खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा विजय झाला असला तरी न्यूझीलंडचा दौरा भारतासाठी एवढा सोपा असणार नाही. सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या टीमपेक्षा न्यूझीलंडची ही टीम नक्कीच तगडी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विराटच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच टेस्ट सीरिज आणि द्विदेशीय वनडे सीरिज जिंकली. त्यामुळे भारतीय टीम आणि विराट कोहलीचा आत्मविश्वास दुणावला असेल.
वनडे सीरिजसाठी भारतीय टीम :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहाल, रविंद्र जडेजा, भु़वनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, विजय शंकर.
वनडे सीरिजच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी न्युझीलंडची टीम :
केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डो ब्रासवेल, कॉलीन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, हेन्री निकोलास, मिशेल सॅन्टेनर, इश सोधी, टिम साऊथी, रॉस टेलर
वनडे मॅचच्या तारखा :
पहिली वनडे : बुधवार २३ जानेवारी, नेपीअर
दुसरी वनडे: शनिवार २६ जानेवारी, माऊंट मॉनगनुई
तिसरी वनडे : सोमवार २८ जानेवारी, माऊंट मॉनगनुई
चौथी वनडे : गुरुवार ३१ जानेवारी, हॅमिल्टन
पाचवी वनडे : रविवार ३ फेब्रुवारी, वेलिग्टंन
टी-२० सीरिज
पहिली टी-२० : बुधवार ६ फेब्रुवारी, वेलिग्टंन, दुपारी १२.३० वाजता
दुसरी टी-२० : शुक्रवार ८ फेब्रुवारी, ऑकलंड, सकाळी ११.३० वाजता
तिसरी टी-२० : रविवार १० फेब्रुवारी, हॅमिल्टन दुपारी १२.३० वाजता