VIDEO: न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर विराट-धोनीची `सेगवे`वर मस्ती
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनी दणदणीत विजय झाला.
नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनी दणदणीत विजय झाला. या विजयानंतर धोनी आणि विराट कोहली मजामस्ती करताना दिसले. धोनी आणि विराट कोहलीनं मैदानात असलेल्या सेगवेवरून फेरफटका मारला. सेगवेवरून फेरफटका मारत असताना विराट कोहलीनं डान्सही केला. भारतीय क्रिकेट संघाच्या फेसबूक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. भारतानं १५६ धावांचं आव्हान ३४.५ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शिखर धवननं नाबाद ७५ धावांची खेळी केली. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं.
खरं तर डकवर्थ-लुईस हा नियम पाऊस आला तर वापरला जायचा, पण यावेळी पहिल्यांदाच जास्त सूर्यप्रकाश असल्यामुळे सामना थांबवण्यात आला. बॅटिंग करत असताना भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात सूर्यप्रकाश जात असल्यामुळे त्यांना बॉल दिसायला अडचण होत होती. त्यामुळे अंपायरनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या तासानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताला ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान मिळालं.
या सामन्यात न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण भारतीय बॉलरनी अचूक मारा करत न्यूझीलंडला सुरुवातीपासून धक्के दिले. त्यामुळे ३८ ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संघ १५७ धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून कुलदीप यादवनं १० ओव्हरमध्ये ३९ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर मोहम्मद शमीला १९ रन देऊन ३ विकेट मिळाल्या. युझवेंद्र चहलला २ आणि केदार जाधवला १ विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं ८४ बॉलमध्ये ६४ धावांची खेळी केली.
विराट कोहलीला विश्रांती
न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे दोन एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली लागोपाठ क्रिकेट खेळतोय, त्यामुळे विराटला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी आरामाची गरज आहे, असं संघ प्रशासन आणि निवड समितीला वाटत असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे.
शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीला बदली खेळाडू अजून देण्यात आलेला नाही. पण हॅमिल्टन आणि वेलिंग्टनच्या एकदिवसीय आणि त्यानंतर ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल. टी-२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे.