पृथ्वी शॉचं हैदराबादविरुद्ध ३४ बॉलमध्ये अर्धशतक, मुंबई फायनलमध्ये
आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये शतक करणाऱ्या पृथ्वी शॉची शानदार कामगिरी सुरूच आहे.
बंगळुरू : आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये शतक करणाऱ्या पृथ्वी शॉची शानदार कामगिरी सुरूच आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉनं ३४ बॉलमध्ये अर्धशतक केलं. या मोसमातलं मुंबईच्या खेळाडूचं हे सर्वात जलद अर्धशतक आहे. पृथ्वी शॉच्या या इनिंगमुळे मुंबईचा या मॅचमध्ये ६० रननी विजय झाला. या विजयाबरोबरच मुंबई विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. दुसरी सेमी फायनल दिल्ली आणि झारखंडमध्ये गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या मॅचमध्ये हैदराबादनं पहिले बॅटिंग करून २४६/८ एवढा स्कोअर केला. के.रोहित रायुडूनं १३२ बॉलमध्ये १२१ रन केले. या मोसमात हैदराबादकडून शतक करणारा रोहित पहिला बॅट्समन आहे. रोहितला हैदराबादच्या इतर बॅट्समननी साथ दिली नाही. फक्त बवांका संदीपनं (२९) २५ पेक्षा जास्त रन केले. मुंबईच्या तुषार देशपांडेनं ३ विकेट, रोयस्टन डीएसनं २ विकेट घेतल्या.
पृथ्वी शॉला दोन जीवनदान
६१ रनची खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला मोहम्मद सिराजच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये २ जीवनदान मिळाली. ३१ आणि ३४ रनवर पृथ्वी शॉचे कॅच सोडण्यात आले. दोन्हीवेळा रवी किरणनं पृथ्वी शॉचे कॅच सोडले. यानंतरही पृथ्वीवर दबाव आला नाही. सिराजच्या पुढच्या ओव्हरच्या लागोपाठ ३ बॉलवर शॉनं दोन सिक्स आणि १ फोर मारून अर्धशतक पूर्ण केलं.
पृथ्वीचं लागोपाठ चौथं अर्धशतक
विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉचं हे लागोपाठ चौथं अर्धशतक आहे. याआधी शॉनं रेल्वेविरुद्ध १२९ रन, कर्नाटकविरुद्ध ६० रन आणि बडोद्याविरुद्ध ९८ रनची खेळी केली होती. पृथ्वीनं हैदराबादविरुद्ध ३४ बॉलमध्ये, बडोद्याविरुद्धही ३४ बॉलमध्ये, रेल्वेविरुद्ध ३६ बॉलमध्ये आणि कर्नाटकविरुद्ध ४१ बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.
रोहित शर्मा १७ रनवर आऊट
पृथ्वीसोबत ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माला मोठा स्कोअर करता आला नाही. रोहित २४ बॉलमध्ये १७ रन करून आऊट झाला. रोहित आऊट झाला तेव्हा मुंबईचा स्कोअर ७३ रन होता. रोहित आऊट झाल्यानंतर ९ रननी पृथ्वी शॉही माघारी परतला आणि मुंबईला दुसरा झटका लागला. मेहदी हसननं पृथ्वीला बोल्ड केलं.
श्रेयस अय्यरचं अर्धशतक
दोन विकेट गेल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणेनं मुंबईचा डाव सावरला. दोघांनी २५व्या ओव्हरला टीमचा स्कोअर १५५/२ पर्यंत पोहोचवला. यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी श्रेयस अय्यर ५५ आणि रहाणे १७ रनवर खेळत होते. पाऊस न थांबल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे मुंबईला विजेता घोषित करण्यात आलं.