PM On Vinesh Phogat : `विनेश पहिली भारतीय जिने....` पदकाची याचिका फेटाळल्यावर विनेश फोगटविषयी काय म्हणाले मोदी?
15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुरुवारी मोदींनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या एकूण 117 खेळाडूंनी विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे खास राहिले नसले, तरी भारतीय खेळाडूंनी एकूण 6 पदकांना गवसणी घातली. ज्यात 5 कांस्य तर 1 रौप्य पदकाचा समावेश होता. 11 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप झाला असून आता बहुतेक खेळाडू हे भारतात परतले आहे. 15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुरुवारी मोदींनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी मोदींनी कुस्तीपटू विनेश फोगटची सुद्धा प्रशंसा केली.
मोदींनी केलं विनेशचं कौतुक :
पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या ऑलिम्पिक प्रदर्शनाबाबत त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांनी यावेळी विनेश फोगटचे सुद्धा कौतुक केले. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. यामुळे तिचे पदक निश्चित मानले जात होते. मात्र अंतिम फेरीपूर्वी केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले. 14 ऑगस्ट रोजी तिची रौप्य पदकाची याचिका सुद्धा फेटाळल्यात आली ज्यामुळे तिला रिकाम्या हाती भारतात परतावे लागणार आहे. मोदींनी विनेशचं कौतुक करताना म्हंटले, "विनेश अशी पहिली भारतीय ठरली जी कुस्तीच्या फायनलपर्यंत पोहोचली. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. ऑलिम्पिकच्या 7 शूटिंग इव्हेंट्समध्ये इंडियन शूटर्स फायनलपर्यंत पोहोचले. असे सुद्धा पहिल्यांदाच घडले."
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे काही खेळाडू अजूनही भारतात परतले नाहीत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा त्याच्या सर्जरीसाठी जर्मनीमध्ये गेला आहे. तर 17 ऑगस्ट रोजी विनेश फोगट भारतात परतेल. तर बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधू ही गुरुवारी दिल्ली येथील मोदींच्या इव्हेंटला उपस्थित राहिली नव्हती.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 7 पदक :
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने तब्बल 7 पदकं जिंकली होती. भारताच्या ऑलिम्पिकमधील इतिहासातील हे सर्वोत्तम प्रदर्शन होते. ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं प्रदर्शन आणखीन उंचावेल अशी अपेक्षा असताना तसे घडले नाही. भारताला यंदा एकही सुवर्ण पदक जिंकण्यात यश आले नाही.