Vinesh Phogat And Bajarang Punia Join National Congress Party : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया हे आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. विनेश आणि बजरंग हे दोघे हरियाणाचे असून काही महिन्यातच येथे विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर विनेश आणि बजरंग हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. शुक्रवार दुपारी 1: 30  वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः बजरंगने माध्यमांना दिली आहे.  काही दिवसांपूर्वी दोन्ही कुस्तीपटूंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ही नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक 2024मुळे चर्चेत आली होती. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक देण्याची याचिका सुद्धा क्रीडा लवादाने फेटाळली, त्यामुळे तिला रिकाम्या होतीच भारतात परतावे लागले. विनेश ही भारताची पहिली कुस्तीपटू आहे, जिने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.   


विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे दोघे मागील वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरुद्ध आंदोलनात रस्त्यावर उतरले होते. ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंसोबत गैरवर्तवणूक केल्या प्रकरणी त्यांना पदावरून दूर करण्यात यावे तसेच त्यांची चौकशी करावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली होती.  येत्या 5 ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिने राजकारणात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते तिला समजावत होते. काही दिवसांपूर्वीच विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी विनेश आणि बजरंग राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.  


विनेश लढवणार निवडणूक? 


सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी कुस्तीपटू विनेश फोगट हिला दादरी येथून विधानसभा लढवण्यासाठी तिकीट दिले जाऊ शकते. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया बादली येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मात्र काँग्रेस त्याला जाट बहुल सिटीमधून निडवणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं प्लॅनिंग करत आहे.  


विनेश राजकारणात आल्याने काय होईल? 


कुस्तीपटू विनेश फोगटच्या राजकारणातील प्रवेशाने हरियाणाच्या राजकारणात मोठे बदल दिसू शकतात. विनेशचे ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांशी चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ती शंभू बॉर्डरवर सुद्धा पोहोचली होती. यावेळी तिने शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी मागणी केली होती.