या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?
Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: "विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल गमावले, त्याबद्दल भारतात फक्त हळहळ व्यक्त झाली. भारत हा पूर्णपणे क्रिकेटमय झालेला देश आहे. क्रिकेटमध्ये भारताचा पराभव होतो तेव्हा संपूर्ण देशालाच सुतक लागल्याचे वातावरण तयार होते. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर भारत क्रिकेटचा वर्ल्ड कप हरला तेव्हा असंख्य घरांत चुली पेटल्या नाहीत, पण कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारून जिंकलेले पदक गमावले तेव्हा किती जणांना खरंच दुःख झाले?" असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एवढ्यावरच न थांबता सरकार आणि प्रशासन ठाममध्ये विनेशच्या पाठीशी उभं राहिलं नाही म्हणून तिला पदक मिळालं नाही असं राऊत यांनी केनियाचं उदाहरण देत सांगितलं आहे. राऊत काय म्हणालेत पाहूयात...
मोदींना सर्व काही मुमकीन आहे असे सांगितले जाते, पण..
"विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटात कुस्ती मारली, पण अंतिम सामन्यात तिचे वजन शंभर ग्रामने वाढले म्हणून तिला स्पर्धेतून आणि आालिम्पिकमधूनच बाद केले व याविरोधात भारताच्या ऑलिम्पिक संघटनेने जोरदार दाद मागितली नाही. पंतप्रधान मोदी हे रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवू शकतात. (अशी त्यांच्या अंधभक्तांची अंधश्रद्धा.) विश्वगुरू म्हणून ते जगात स्वतःच्या ताकदीचा डंका वाजवू शकतात. मोदींना सर्व काही मुमकीन आहे असे सांगितले जाते, पण पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये एका भारतीय महिला कुस्तीपटूवर अन्याय झाला. त्या महिलेस ते न्याय देऊ शकले नाहीत व विनेश फोगाटने जिंकलेला डाव गमावला. फोगाटने आता कुस्तीलाच रामराम केला. हे दुःखद आणि दुर्दैवी आहे," असं राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरातील लेखात म्हटलं आहे.
फोगाट ऑलिम्पिकला जाण्याआधीच म्हणालेली, 'माझ्याविरुद्ध षड्यंत्र...'
"अमीर खानने ‘दंगल’ चित्रपटाची निर्मिती केली. कुस्ती क्षेत्रातील दोन मुलींच्या संघर्षाची, तिच्या वडिलांच्या लढ्याची, मान-अपमानाची व शेवटी त्यांच्या विजयाकडे झेपावण्याची ही कहाणी. हरयाणातील फोगाट भगिनींच्या जीवनावरच हा चित्रपट निर्माण झाला. हे कथानक रोमांचक व थरारक होते. कुस्तीच्या क्षेत्रात कोणते राजकारण चालते ते यानिमित्ताने पडद्यावर दिसले. भारताच्या कुस्ती संघटनेत महिला कुस्तीपटूंना कोणत्या दिव्यातून जावे लागते ते याच विनेश फोगाटने जगासमोर आणले. प्रशिक्षणार्थी महिला कुस्तीपटूंच्या शोषणाविरुद्ध विनेश फोगाट व तिच्या सहकाऱ्यांना दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर आंदोलन करावे लागले. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला गेला. भारताच्या या महान महिला कुस्तीपटूला पोलिसांनी फरफटत बाहेर काढले ते देशाने पाहिले. तरीही विनेश फोगाटने सराव केला व ऑलिम्पिकमध्ये धडक मारली, पण “आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. ऑलिम्पिकमध्ये काय घडते पाहू,’’ असे फोगाट हिने पॅरिसला जाण्यापूर्वीच सांगितले," असं म्हणत संजय राऊतांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
नक्की वाचा >> 'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'
सर्व विनेशनेचं केलं मग ऑलिम्पिक संघटना काय करत होती?
"आता एक नवीनच माहिती समोर आली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हिसकावून घेताच भारत देश व त्या देशाचे शासन फक्त स्तब्ध झाले, पण निराश होऊनही विनेश अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभी राहिली. विनेश व्यक्तिगतरीत्या आर्बिटेशनमध्ये गेली. त्यानंतर आता आपली लाज जाईल म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तिला सपोर्ट केला. पॅरिसमधील काही स्वयंसेवी वकील, स्वयंसेवी संघटना, PRO BONO तिचा खटला लढतील. PRO BONO म्हणजे मोफत सेवा. हे सर्व फोगाटने स्वतः केले. तोपर्यंत आपली ऑलिम्पिक संघटना काय करत होती? भारताची ऑलिम्पिक संघटना कुचकामी ठरली आहे. भारताला शक्य असेल तर ती बरखास्तच केली पाहिजे," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
या देशाने आपल्या खेळाडूला पदक पुन्हा कसं मिळवून दिलं?
"विनेश फोगाटने सुवर्ण पदक निश्चित केले होते. ते गळ्यात पडण्यापूर्वीच तिला बाद केले गेले व देश फक्त स्तब्ध झाला. स्पर्धेतून कोणाला अन्याय्य पद्धतीने बाद केले असेल तर त्याविरोधात अपील करण्याची मुभा ऑलिम्पिकमध्ये आहे. पारिस ऑलिम्पिकमध्येच हे घडलंय. फक्त त्या देशात दम असायला हवा. केनियासारख्या लहान आणि कमजोर देशाला जे जमले ते भारताच्या बोलघेवड्या नेत्यांना व विश्वगुरू पंतप्रधानांना का जमले नाही? केनियाच्या Faith Kipyegon या खेळाडूने 5 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. तिला विनेश फोगाटप्रमाणे बाद करण्यात आले. तिचे रौप्य पदक काढून घेतले. केनियाच्या सरकारने व ऑलिम्पिक प्रशासनाने पूर्ण ताकद लावली. आपल्या खेळाडूवरील अपात्रतेचा निर्णय रद्द करून घेतला. तिला तिचे रौप्य पदक परत मिळवून दिले. सरकारमध्ये ‘दम’ असला की, असे घडते," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
तो खर्च भाजपाच्या निवडणूक निधीतून झाला नाही
"विनेश फोगाटला भारताच्या राजकीय सडक्या व्यवस्थेने हरवले हेसुद्धा त्या इतिहासात रेखांकित केले जाईल. विनेश फोगाट देशाची कन्या आहे. त्या कन्येसाठी आता देश काय करणार? देशाचे क्रीडा मंत्री संसदेत सांगतात, विनेश फोगाटच्या प्रशिक्षणासाठी सरकारने 77 लाख रुपये खर्च केले. हे पैसे भाजपने त्यांच्या निवडणूक निधीच्या खात्यातून दिले नाहीत. हे जनतेचे पैसे आहेत. फोगाट लढली, जिंकली व हरली. देश फक्त स्तब्ध झाला. सत्ताधाऱ्यांनी चेहऱ्यावर दुःख दाखवले, पण आतून त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. या कन्येसाठी देश काय करणार? तिला भारतरत्न देणार? जरूर द्या. विनेशला राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत एकमताने पाठवून तिचा सन्मान करा," असं राऊत यांनी म्हटलं आहे.