विनोद कांबळीनं असा साजरा केला सचिनचा वाढदिवस
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४३५७ धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्डही आहे. त्याने वनडेत १८४२६ आणि कसोटीत १५९२१ धावा केल्यात. २४ एप्रिल १९७३मध्ये एक वाजता मुंबईत सचिनचा जन्म झाला. सचिनचा बालमित्र विनोद कांबळीनंही त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. विनोद कांबळीनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सचिनला केक भरवतानाचा फोटो शेअर केला आहे. तसंच विनोद कांबळीनं सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
सचिन-विनोदमध्ये आला होता दुरावा
२००९ साली विनोद कांबळीनं सच का सामना या शोमध्ये केलेल्या वक्तव्यावरून या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सचिननं मला मदत केली नाही, असं वक्तव्य विनोद कांबळीनं या शोमध्ये केलं होतं. पण काही दिवसांपुर्वी झालेल्या मुंबई टी-20 लीगच्या एका सोहळ्याला दोघं उपस्थित होते. यावेळी विनोद कांबळीनं सचिन तेंडुलकरचे पाय धरले होते.