मुंबई : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीचे अनेक किस्से आत्तापर्यंत क्रिकेट रसिकांनी ऐकले आहेत. शालेय क्रिकेट स्पर्धेत १९८८ साली दोघांनी ६६४ रनची पार्टनरशीप करत क्रिकेट जगतात पहिल्यांदाच नाव झळकावलं. दोघांनी भारताकडूनही क्रिकेट खेळलं. पण विनोद कांबळीची कारकिर्द जास्त काळ टिकली नाही. भारतीय टीममधून बाहेर फेकला गेल्यानंतर विनोद कांबळी सचिनसोबत फारच कमीवेळा दिसला. आता हे दोन्ही मित्र पुन्हा एकदा जवळ येत असल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद कांबळीनं त्याच्या हातावर एक टॅटू गोंदवला आहे. या टॅटूवर सचिन तेंडुलकरचं नाव आहे. आपण आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी करतो ज्या टिकत नाहीत. पण सचिनसाठी बनवलेलं हे टॅटू कायमच टिकेल, असं विनोद कांबळी म्हणाला. विनोद कांबळीनं त्याच्या उजव्या खांद्यावर हे टॅटू गोंदवलं आहे.



कांबळीच्या या ट्विटवर सचिन तेंडुलकरनंही प्रतिक्रिया दिली आहे. आपण एवढे वर्ष एकमेकांना ओळखतो, पण तू अजूनही बदलेला नाहीस. आजही तू मला सरप्राईज देतोस, असं ट्विट सचिननं केलं.



सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. पण काही वर्ष आधी या दोघांच्या मैत्रीमध्ये कटुता आली होती. सचिननं मनात आणलं असतं तर माझी कारकिर्द आणखी मोठी झाली असती, असं विनोद कांबळी एका रियलिटी शोमध्ये म्हणाला होता. यामुळे सचिन आणि विनोद कांबळीमधले संबंध ताणले गेले होते. सचिन २०१३ साली क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यावेळी केलेल्या भाषणातही सचिननं विनोदबद्दल अवाक्षरही काढलं नव्हतं.


यानंतर ८ वर्षांनी पुन्हा सचिन आणि विनोद कांबळी एकत्र आले. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान हे दोघं एकाच व्यासपीठावर होते. माझ्या आणि सचिनमधले मतभेद आता संपले आहेत, आणि आता सगळं व्यवस्थित आहे. आम्ही एकमेकांना मिठी मारली. आमची मैत्री आता ट्रॅकवर आली आहे, असं विनोद कांबळी या कार्यक्रमात म्हणाला होता.