`तुझी खेळायची लायकी नाही, परत जा,` चाहता भर मैदानात बाबर आझमकडे पाहून ओरडला, त्याने वळून पाहिलं अन्...; VIDEO व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी 3 धावा केल्या आहेत. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली असून संघात स्थान देण्यावरुन प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या क्रिकेटप्रेमींच्या निशाण्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बाबर आझम अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. शनिवारी सिडनीमध्ये झालेल्या सामन्यात सिडनी क्रिकेट मैदानातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 13 धावांनी पराभव केला. बाबर आझमने पहिल्या दोन सामन्यात 3 धावा केल्या आहेत. यामुळे बाबर आझमच्या टी-20 संघातील स्थानावरुन प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान सिडनीमधील सामन्यादरम्यान बाबर आझमला चाहत्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. बाबर आझम सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना काही चाहत्यांनी शेरेबाजी करत त्याचा अपमान केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
चाहत्याने बाबर आझमचं नाव घेत त्याच्यावर अनेक आक्षेपार्ह ताशेरे ओढले. 'थोडी तरी लाज बाळग, टी-20 संघात तुझी अजिबात जागा नाही. तू पुन्हा परत लाहोरला जा', असं चाहता ओरडतो. काही वेळाने बाबर आझम मागे वळून पाहताना दिसतो. यादरम्यान त्याच्यासाठी चिअर करणाऱ्यांना तो अभिवादन करतो.
दरम्यान बाबर आझम क्षेत्ररक्षण करताना गोलंजासाठी टाळ्या वाजवतो. हे पाहिल्यावर तो चाहता पुन्हा ओरडतो की, "ओह, तुला राग आला का? पुन्हा एकदा आमच्याकडे रागाने बघ. तू फक्त कॅच ड्रॉप कर आणि इतरांसाठी टाळ्या वाजव".
सिडनीमध्ये, स्पेन्सर जॉन्सनने 26 धावांवर 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानवर 13 धावांनी विजय मिळवून दिला आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खिशात घातली. हारिस रौफने 22 धावांवर4 विकेट घेत यजमानांना रोखण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाने 148 धावा केल्या होत्या. उस्मान खानने 52 धावा असूनही अंतिम षटकात पाकिस्तानचा डाव 134 धावांवर आटोपला.
सोमवारी होबार्ट येथे झालेला पहिल्या सामना 29 धावांनी जिंकला. पावसामुळे हा सामना प्रभावित झाला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार जोश इंग्लिस म्हणाला, "गोलंदाजांनी फार उत्तम कामगिरी केली आहे. या संघात बरेच पर्याय आहेत, ज्यांचा मी वापर करु शकतो. मी आज रात्री जॉन्सनला संधी दिली तर त्याने विकेट मिळाली. आज रात्री त्यांनी ज्या प्रकारे खेळ केला तो खरोखरच चांगला होता." सोमवारी तिसरा सामना होणार आहे.