एंटिगा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला एंटिगामध्ये सुरुवात झाली आहे. या टेस्ट मॅचआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीला रोहित शर्माला ओपनिंगला खेळवण्याचा सल्ला दिला होता. पण विराटने मात्र दादाचा हा सल्ला ऐकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वर्ल्ड कपमध्ये रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. रहाणेही ऑस्ट्रेलियात त्याच्या नेहमीच्या शैलीत दिसला नाही. त्यामुळे रोहितला संधी द्यायची का रहाणेला, हा महत्त्वाचा निर्णय विराटला घ्यावा लागणार आहे,' असं दादा म्हणाला होता.


'रोहितला हाच फॉर्म टेस्ट क्रिकेटमध्येही कायम ठेवण्यासाठी ओपनिंगला संधी द्यावी आणि रहाणेने मधली फळी भक्कम ठेवण्याचं काम कायम ठेवावं,' असं मत सौरव गांगुलीने मांडलं होतं.


नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने तब्बल ५ शतकं करून विश्वविक्रम केला होता. तसंच वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं करणारा रोहित हा जगातला एकमेव खेळाडू आहे. वनडे आणि टी-२० मधलं रोहितचं स्थान पक्कं असलं, तरी टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र रोहितला झगडावं लागलं.


२०१८ साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहितने ४ इनिंगमध्ये फक्त ७८ रन केले. यानंतर त्याला टेस्ट टीममधून डच्चू देण्यात आला. २०१८च्या शेवटी ऑस्ट्रेलियात रोहित २ टेस्ट खेळला. तर रोहितला दुखापतीमुळे एक टेस्ट मुकावी लागली. मुलीचा जन्म झाल्यामुळे रोहित चौथी टेस्ट खेळला नाही.


टेस्ट टीमचा ओपनर पृथ्वी शॉवर सध्या डोपिंगप्रकरणी बंदी घालण्यात आलेली आहे. तर ओपनर मयंक अग्रवाल फक्त २ टेस्ट मॅचच खेळला आहे. केएल राहुल अनुभव असलेला एकमेव ओपनर आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या मेलबर्न टेस्टमध्ये ऑलराऊंडर हनुमा विहारीने ओपनिंगला बॅटिंग केली होती.