World Cup 2019 : कर्णधारांची `विराट` फौज राणीच्या भेटीला
राणीने खेळाडूंशी संवादही साधला
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी बुधवारी इंग्लंडच्या राणीची भेट घेतली. राणी एलिझाबेथ यांच्यासोबतच त्यांनी लंडन येथील बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स हॅरीचीही भेट घेतली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून या भेटीची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. यातीत एका छायाचित्रात राणीसह सर्व संघाचे खेळाडू दिसत आहेत. तर, दुसऱ्या एका छायाचित्रात राणी खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. राजघराण्य़ाकडूनही सोशल मीडियावर या भेटीची छायाचित्र पोस्ट करण्यात आली.
बकिंघम पॅलेस येथील लंडन मॉल येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या उदघाटन सोहळ्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच सर्व संघांच्या कर्णधारांनी राणीची भेट घेतली. दरम्यान, सध्याच्या घडीला भारतीय क्रिडाविश्वासोत संपूर्ण विश्वात हवा आहे ती म्हणजे क्रिकेटच्या या महासंग्रामाची. गुरुवारपासून सुरू असणारा क्रिकेटचा हा महाकुंभ जवळपास पुढील दीड महिना क्रीडारसिकांसाठी परवणी ठरणार आहे.
उदघाटन सोहळ्याला मलालाची खास उपस्थिती
नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाईने या उदघाटन सोहळ्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. 'क्रिकेटमध्ये महिला जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होत आहेत, हे आपण पाहू शकतो. माझ्यामते महिलांनी आणखी मोठ्या प्रमाणात खेळांमध्ये सहभागी व्हावं', असं ती म्हणाली. लहानपणापासूनच क्रिकेटप्रती असणारी आत्मियता व्यक्त करत हा खेळ एका वेगळ्याच प्रकारच्या संस्कृतीला येणाऱ्या नव्या पिढीशी जोडतो हा विचार तिने मांडला.