लंडन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यात ९ जून रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्डकपमधील विजयी कामगिरी कायम ठेवली. टीम इंडियाच्या विजयानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या पत्रकारपरिषदेत कर्णधार कोहलीने स्टीव स्मिथची माफी मागितली. कोहलीने स्टीव स्मिथची माफी का मागितली असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.


नक्की काय घडलं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनधिकृतपणे बॉल कुरतडरल्या प्रकरणी स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी टाकण्यात आली होती. वर्षभरानंतर त्यांनी वर्ल्डकप टीममध्ये आगमन केले. या दोन्ही खेळाडूंनी झालेल्या प्रकाराबाबत माफी देखील मागितली. परंतु भारतीय प्रेक्षकांच्या मनातील राग कमी झाला नव्हता. मॅचदरम्यान मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी स्मिथ आणि वॉर्नरची चेष्ठा केली. हा सर्व प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये घडला. त्यावेळेस मैदानात कोहली बॅटींग करत होता.



ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया मॅचला भारतीय चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. जेव्हा भारतीय समर्थक स्मिथ आणि वॉर्नरला टार्गेट करत असल्याचे लक्षात आले. तेव्हा कोहलीने त्याच क्षणी भारतीय चाहत्यांना मैदानातूनच अशी कृती न करण्याचं आवाहन केलं.



कोहलीच्या या कृतीने त्याने आपल्यातील खेळाडूवृत्ती दाखवून दिली. कोहलीच्या या मोठेपणासाठी स्मिथने त्याच्याजवळ येऊन त्याचे आभार मानले. परंतु आपल्या चाहत्यांकडून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना डिवचल्याची खंत कोहलीच्या मनात होती. मॅच संपल्यानंतर पत्रकार परिषदेत कोहलीने यावर प्रतिक्रिया दिली.


काय म्हणाला कोहली ?


'क्रिकेट प्रेक्षकांकडून झालेल्या कृतीसाठी मी माफी मागतो. वॉर्नर आणि स्मिथला डिवचण्याचा प्रकार याआधी देखील झाला आहे. या मॅचदरम्यान मोठ्या प्रमाणावर टीम इंडियाचे समर्थक उपस्थित होते. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर टीका करण्यासारखं त्यांनी काहीचं केले नाही. त्यांनी केलेल्या चुकीसाठी त्यांनी शिक्षा भोगली आहे. जे झालं ते पुन्हा पुन्हा बोलून एखाद्याचं मनोधर्य़ कमी करु नये. तो चांगली कामगिरी करतो आहे. चाहत्यांकडून या दोन्ही खेळाडूंना देण्यात आलेली वागणूक मला योग्य वाटली नाही. त्यासाठी मी भारतीय चाहत्यांच्या वतीने माफी मागतो.' असं विराट म्हणाला.