Virat Kohli Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज आणि भारतीय फलंदाजीचा कणा म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहली सध्या चर्चेत आहे. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच अचानक संघाची साथ सोडून मुंबईत पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी विराट आल्याने आता अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात आहेत. त्यातच विराटला आणखीन एक गोष्ट सतावत असल्याचं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन स्पष्ट होत आहे. 


विराट कंटाळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट केलेल्या पोस्टमधून त्याचे अनेक निकटवर्तीय, मित्र आणि नातेवाईक त्याच्याकडे वर्ल्डकपच्या तिकीटांसाठी विचारणा करत असल्याचं दिसत आहे. या नकोश्या मागण्यांना विराट कंटाळल्याचा अंदाज त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन बांधता येत आहे. सोशल मीडियावर विराटने एक आवाहन केलं आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची मदत तिकीटांसाठी मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नका असं विराटने सांगितलं आहे. 


विराटने स्टोरीत नेमकं काय म्हटलंय?


"वर्ल्डकप स्पर्धा जवळ येत असताना मला माझ्या सर्व मित्रांना फार प्रेमाने हे सांगायचं आहे की या संपूर्ण स्पर्धेमध्ये माझ्याकडे तिकीटांसाठी विचारणा करु नका. तुम्ही तुमच्या घरुनच या वर्ल्डकपच्या सामन्यांचा आनंद घ्या," असा मजकूर विराटने इन्स्टाग्राम स्टोरीमधून पोस्ट केला आहे. विराटच्या या पोस्टवरुन मागील काही दिवसांपासून त्याच्याकडे सातत्याने भारतीय सामन्यांसाठीच्या तिकीटांची विचारणा केली जात असल्याचं उघड होत आहे.



यापूर्वी इतर खेळाडूंनीही केलीय अशी तक्रार


अशाप्रकारे तिकीटांची मागणी केवळ विराटकडेच केली जाते असं नाही. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांबरोबरच मित्रांकडूनही तिकीटांसाठी विचारणा होत असल्याचं म्हटलं आहे. अनेक खेळाडूंनी वेळोवेळी आपण अशापद्धतीने तिकीटांची व्यवस्था करु शकणार नाही असं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. सामन्याच्या सरावावर लक्ष केंद्रीत करावं की या असल्या मागण्या पूर्ण कराव्यात असा संभ्रम खेळाडूंमध्ये अशा वेळेस निर्माण होतो असंही काही खेळाडूंनी यापूर्वी म्हटलं आहे.


तिकीटांना तुफान मागणी


भारताचा वर्ल्डकपमधील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतचा पहिला सामना चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहेत. भारताच्या सामन्यांच्या तिकिटांना मोठी मागणी आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना खेळवला जाणार असून या सामन्याची तिकीटंही हातोहात संपली आहेत. विशेष म्हणजे आता अनेक ठिकाणी ही तिकीटं काळ्या बाजारात विकली जाण्याची शक्यता असून या तिकीटांच्या मूळ किंमतीपेक्षा अनेकपट अधिक किंमत त्यासाठी मोजावी लागणार आहे. बीसीसीआयच्या वेबसाईटवरुन ऑनलाइन माध्यमातून तिकीट विक्री केली जात आहे. अमहदाबादमधील सर्व हॉटेल्स आणि राहण्याच्या जागांची बुकीं 14 ऑक्टोबरच्या आसपासच्या तारखांमध्ये फूल झाल्याच्याही बातम्या आहेत.