मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमात विराटच्या बंगळुरू टीमने निराशा केली आहे. पण विराट कोहली मात्र दिवसेंदिवस नव्या विक्रमांना गवसणी घालत आहे. विराट कोहलीला लागोपाठ तिसऱ्या वर्षी 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. लागोपाठ ३ वर्ष हा पुरस्कार जिंकणारा विराट पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विस्डन अलमानेकचा नवा अंक बुधवार १० एप्रिलला प्रकाशित झाला. यामध्ये विराटशिवाय टॅमी ब्यूमोंट, जॉस बटलर, सॅम करन, राशिद खान आणि रोरी बर्न्स यांना 'विस्डन फाईव्ह क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला आहे. महिला क्रिकेट टीममध्ये स्मृती मंधनाला 'वूमन लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानला 'बेस्ट टी-२० प्लेयर' पुरस्कार देण्यात आला.


विस्डनने 'लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराला २००३ साली सुरुवात केली होती. याआधी हे मासिक 'क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराची निवड करायची. पण आता विस्डन 'फाईव्ह क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार देते.


विराट कोहलीला २०१६ आणि २०१७ सालीदेखील विस्डन लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला होता. आता २०१८ सालीही याची पुनरावृत्ती झाली आहे. विराटने २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण २,७३५ रन केले होते. यामध्ये इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमधल्या ५९३ रनचाही समावेश आहे. विराटने मागच्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये ५ शतकं झळकावली होती.


विराटच्या आधी फक्त ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन आणि इंग्लंडच्या जॅक होब्स यांना तीनपेक्षा जास्त वेळा 'विस्डन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला आहे. सर डॉन ब्रॅडमन यांना १० वेळा आणि जॅक होब्स यांना ८ वेळा हा पुरस्कार मिळाला. पण लागोपाठ तीनवेळा हा पुरस्कार पटकवण्याचा मान विराटलाच मिळाला आहे.


'विस्डन वूमन लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पटकावणाऱ्या स्मृती मंधनाने मागच्या वर्षी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये एकूण १,३३१ रन केले होते. मंधनाने वनडे क्रिकेटमध्ये ६६९ रन आणि टी-२० क्रिकेटमध्ये ६६२ रन केले होते.