IPL 2022 : संपूर्ण कारकिर्दीत नाहीत तितक्या या हंगामात चुका, दिग्गज खेळाडूची विराटवर टीका
बंगलोरचा आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला प्रवास संपला, पण त्याही पेक्षा जास्त टीका झाली ती विराट कोहलीच्या कामगिरीवर
IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातला विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) प्रवास संपला आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आरसीबीचा (RCB) सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. यासह विराटच्या कारकिर्दीतील खराब आयपीएलही संपुष्टात आलं. यावर्षी विराटच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके झाली. त्याने 16 सामन्यात 22 .73 च्या सरासरीने केवळ 341 धावा केल्या.
विराट कोहलीच्या या फ्लॉप शोवरुन चाहत्यांबरोबरच अनेक दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virat Kohli) यानेही विराटच्या निराशाजनक कामगिरीवर टीका केली आहे. आयपीएलच्या या हंगामात विराट कोहली लौकीकाला साजेसा खेळ केला नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. एका आयपीएल हंगामात त्याने 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीपेक्षा जास्त चुका केल्या असं सेहवागने म्हटलं आहे.
गेली अडीच वर्षे शतकासाठी झगडणाऱ्या विराट कोहलीला यावेळी आयपीएलमध्ये एकदाही दमदार कामगिरी करता आली नाही. बहुतेक सामन्यांमध्ये आरसीबीसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या कोहलीने अतिशय संथ फलंदाजी केली आणि बहुतांश सामन्यांमध्ये तो झटपट बाद झाला.
एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना सेहवाग म्हणाला, "हा तो विराट कोहली नाही ज्याला आपण ओळखतो. हा दुसराच विराट या हंगामात खेळतान दिसला. त्याने एका मोसमात इतक्या चुका केल्या आहेत जितक्या त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत केल्या नाहीत. विराट धावांसाठी झगडाताना दिसत होता. यातच त्याने आपली विकेटही गमावली, असं सेहवागने म्हटलं आहे.
सेहवाग म्हणाला, 'जेव्हा तुमचा फॉर्म खराब असतो, तेव्हा तुम्ही प्रत्येक चेंडूवर फटके मारण्याचा प्रयत्न करता. फलंदाजाला असं वाटतं मोठे फटके मारले तर आत्मविश्वास परत मिळेल. विराटने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात अनेक चेंडू सोडले. असं केव्हा घडतं जेव्हा फॉर्म वाईट असतो.
विराटने सर्वांची निराशा केली. मोठ्या सामन्यात मोठ्या खेळाडूने चांगलं खेळावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याने स्वतःला नाही तर आरसीबीच्या लाखो चाहत्यांना निराश केलं आहे, असंही सेहवागने म्हटलं आहे.