मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोज वेगवेगळी रेकॉर्ड बनवत आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये ३५ शतकं आहेत. या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरनं वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म बघता तो हे रेकॉर्ड लवकरच तोडेल, असं दिसतंय. विराट कोहली एकीकडे हे विक्रम करत असतानाच त्याला एका टीमबरोबर क्रिकेट खेळायला कंटाळा येतोय. खुद्द विराट कोहलीनंच याबाबत खुलासा केला आहे.


श्रीलंकेविरुद्ध खेळण्याचा विराटला कंटाळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्ध क्रिकेट खेळायला कंटाळा येत असल्याचं विराट कोहली म्हणाला आहे. श्रीलंकेविरुद्ध एकसारखं क्रिकेट खेळल्याचा तुला कंटाळा येतो का, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. तेव्हा विराटनं हो असं उत्तर दिलं. काही दिवसांपुर्वी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20सीरिजमधून विराटनं माघार घेतली होती. अनुष्का शर्मासोबत इटलीमध्ये लग्न असल्यामुळे विराट ही सीरिज खेळला नव्हता.


गेल्या काही दिवसांपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये वारंवार मॅच होत आहेत. यातल्या जवळपास सगळ्याच मॅच एकतर्फी होत असून यामध्ये भारताचा विजय होतो. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनीही श्रीलंकेविरुद्ध सारख्या होणाऱ्या मॅचवर टीका केली होती. मागच्या वर्षी भारत श्रीलंकेविरुद्ध दोन सीरिज खेळला होता. श्रीलंका दौऱ्यावर भारतानं टेस्ट, वनडे आणि टी-20 मॅचची सीरिज खेळली. तर २०१७ सालच्या शेवटी श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यासाठी आली होती.