विराट कोहलीनं सचिनला टाकलं मागे
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा नऊ विकेट्सनं शानदार विजय झाला.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा नऊ विकेट्सनं शानदार विजय झाला. शिखर धवनच्या नाबाद १३२ रन्स आणि विराट कोहलीच्या ४४व्या वनडे हाफ सेंच्युरीमुळे भारतानं श्रीलंकेला नमवलं. या मॅचमध्ये ७० बॉलमध्ये ८२ रन्स केलेल्या विराट कोहलीनं सचिनला मागे टाकलं आहे. रन्सचा यशस्वी पाठलाग करताना कोहलीनं ४ हजार रन्सचा टप्पा ओलांडला आहे.
या यादीमध्ये ५,४९० रन्स करणारा सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे तर ४,१८६ रन्स करणारा ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीनं हा ४ हजार रन्सचा टप्पा फक्त ६४ इनिंग आणि १००.०२च्या सरासरीनं केल्या आहेत. हेच रेकॉर्ड बनवण्यासाठी सचिन तेंडुलकरला १२४ इनिंग आणि पॉटिंगला १०४ इनिंग लागल्या होत्या. या रन्स सचिननं ५५.४५च्या सरासरीनं आणि पॉटिंगनं ५७.३४च्या सरासरीनं केल्या होत्या.
जुलैमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या पाचव्या वनडेमध्ये विराट कोहलीनं वनडेमधली २८वी सेंच्युरी झळकावली होती. रन्सचा पाठलाग करतानाची ती १८वी सेंच्युरी होती. या १८ सेंच्युरी करायला विराटला १०२ इनिंग लागल्या होत्या तर सचिननं रन्सचा पाठलाग करताना २३२ इनिंगमध्ये १७ सेंच्युरी झळकावल्या होत्या.