क्रिकेटमधल्या या फॉरमॅटविरुद्ध आहे कोहली, म्हणतो खेळणार नाही
भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या रोखठोक मतासाठी ओळखला जातो.
लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या रोखठोक मतासाठी ओळखला जातो. यावेळीही त्यानं क्रिकेटच्या १०० बॉलच्या फॉरमॅटबद्दल असंच मत व्यक्त केलं आहे. काही वेळा प्रमाणाबाहेर क्रिकेट खेळल्यामुळे अडचण होते. व्यावसायिकतेचा परीणाम क्रिकेटच्या गुणवत्तेवर होत आहे. यामुळे मी दु:खी आहे. तसंच मी १०० बॉल क्रिकेट खेळणार नाही, असंही विराटनं स्पष्ट केलं आहे. जे खेळाडू या फॉरमॅटमध्ये खेळू इच्छीतात त्यांच्यासाठी हे रोमांचक आहे, पण मी क्रिकेटचा आणखी एक फॉरमॅट खेळू शकत नाही. मी क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटच्या प्रयोगाचा हिस्सा बनणार नाही, असं विराट म्हणाला.
मला आयपीएल खेळायला आवडतं, मी बिग बॅश लीगही बघतो कारण या स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्धी भावना आहे, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं १०० बॉलची क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
दुखापतीमुळे विराट कोहलीला यंदा सरेकडून काऊंटी क्रिकेट खेळता आलं नाही. पण काऊंटी क्रिकेट खेळणं मला आवडतं. यावेळी खेळता आलं नाही पण भविष्यात नक्की खेळीन, असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं.
जर तुम्ही प्रथम श्रेणी क्रिकेटला महत्त्व देणार नसाल तर खेळाडू टेस्ट क्रिकेट खेळण्यात उत्साह दाखवणार नाही. टी-२० लीगची लोकप्रियता वाढल्यानंतर क्रिकेट बोर्डांना घरगुती क्रिकेटला महत्त्व द्यायची गरज आहे, कारण सुविधा आणि खेळाचा स्तर वाढला तर उत्सुकता वाढेल, असं मत विराटनं व्यक्त केलं आहे.
पुढच्या वर्षी सुरु होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशीपबद्दलही विराटनं भाष्य केलं आहे. यामुळे टेस्ट क्रिकेट आणखी पुढे जाईल. टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दोन्ही टीममध्ये कडवी झुंज होईल आणि अनेक उतार चढाव पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी मी उत्सुक आहे, असं विराट म्हणाला.