मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा फोर्ब्सच्या यादीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. विराटची वार्षिक कमाई २ कोटी ५० लाख डॉलर एवढी आहे. यानंतरही विराट कोहलीची फोर्ब्सच्या यादीत १७ स्थानं पिछेहाट झाली आहे. फोर्ब्सच्या यादीत आता विराट कोहली १००व्या स्थानावर आहे. या यादीत बार्सिलोना आणि अर्जेंटीनाचा फूटबॉलपटू लिओनल मेस्सी पहिल्या क्रमांकावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीनुसार कोहलीला जाहिरातींच्या माध्यमातून २.१ कोटी डॉलर आणि वेतन तसंच विजयानंतर ४० लाख डॉलरची कमाई होते. मागच्या १२ महिन्यांमध्ये विराटची कमाई २.५ कोटी डॉलर एवढी आहे.


मागच्या वर्षी कोहली या यादीमध्ये ८३व्या क्रमांकावर होता. पण यावर्षी त्याच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. असं असलं तरी जाहिरातींमधली विराटची कमाई १० लाख डॉलरनी वाढली आहे.


मेस्सीने जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून निवृत्ती घेतलेला बॉक्सर फ्लायड मेवेदरला मागे टाकलं आहे. मेस्सीची या वर्षातली एकूण कमाई १२.७ कोटी डॉलर आहे. मेस्सीनंतर पोर्तुगालचा फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा दुसरा क्रमांक लागतो. रोनाल्डोची कमाई १०.९ कोटी डॉलर आहे.