ऑकलंड : रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुमध्ये तिसरी वनडे मॅच खेळल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय टीम न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाली. टीम इंडियाच्या या कार्यक्रमावर विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयने ट्रॅव्हल प्लानवर पुन्हा विचार करावा, असा सल्ला विराट कोहलीने दिला आहे. जेव्हा परदेश दौरा असतो तेव्हा वेळापत्रक थोडं सुटसुटीत असायला पाहिजे. थेट स्टेडियममध्ये जायला घाई होत आहे. भारतीय वेळेनुसार हे ठिकाण साडेसात तास पुढे आहे, अशात स्वत:ला ढाळून घेणं कठीण होतं, असं विराट म्हणाला. भविष्यात या गोष्टींवर लक्ष दिलं जाईल, अशी अपेक्षा विराटने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे बीसीसीआयने मात्र या ट्रॅव्हल प्लानचा बचाव केला आहे. कोहलीला याबाबत तक्रार असेल तर त्याने याबाबत मीडियाशी बोलण्यापेक्षा आमच्यासोबत बोलायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयने दिली आहे.


कोहलीला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. खेळाडूंना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून बीसीसीआय शक्य असेल तेवढे सगळे प्रयत्न करते. खेळाडूंची सुविधा बघूनच ट्रॅव्हल प्लान केला जातो. वर्ल्ड कपआधी आम्ही खेळाडूंना जेवढा संभव होता तेवढा वेळ दिला. दिवाळीमध्येही खेळाडूंना ब्रेक देण्यात आला, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


हे वेळापत्रक प्रशासकीय समिती असताना बनवण्यात आलं आहे. कोहलीला जर तक्रार होती तर त्याने मीडियाशी नाही तर बीसीसीआयच्या सचिवांशी बोलायला पाहिजे होतं. कोहलीने असं केलं असतं तर त्यावर उपाय करता आले असते. कोहलीला त्याचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण प्रत्येक गोष्ट मांडण्याची एक प्रक्रिया आहे, त्याचं पालन केलं गेलं पाहिजे होतं, असं दुसरा अधिकारी म्हणाला.


कोहलीने मॅचच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यस्त वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला थेट स्टेडियममध्ये पोहोचायचीच वेळ आली, असं विराट म्हणाला.