आयसीसीच्या क्रमवारीत विराट, बुमराह अव्वलस्थानी कायम
कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ५ मॅचच्या सीरिजमध्ये एकूण ३१० रन केल्या.
दुबई : आयसीसीने नुकतीच वनडे क्रिकेटसाठीची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह या दोघांनी आपले क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आयसीसीच्या बॅट्समनच्या यादीत विराट कोहली ८९० पॉईंटसह तर बुमराह बॉलरच्या यादीमध्ये ७७४ पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ५ वनडेच्या सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला. भारताने पहिल्या दोन मॅच जिंकून देखील सीरिज २-३ ने गमावली. या सीरिजमध्ये पराभव झाल्याने भारताने तब्बल ४ वर्षाने मायदेशात सीरिज गमावली. असे असले तरी कॅप्टन कोहलीने या सीरिजमध्ये आपले सर्वस्व पणाला लावून भारताला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. कोहलीने या सीरिजमध्ये एकूण ३१० रन केल्या. यामध्ये २ शतकांचा समावेश होता. कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच वनडे मॅचमध्ये अनुक्रमे ४४, ११६, १२३, ७ आणि २० अशी खेळी केली होती. या खेळीमुळे त्याला आयसीसीच्या बॅट्समनच्या यादीतील अव्वल स्थान कायम राखता आले आहे.
भारताचा ओपनर रोहित शर्माने या सीरिजमध्ये २०२ रन केल्या. यातील ९५ रनची खेळी ही सर्वोत्तम खेळी ठरली. या कामगिरीमुळे रोहितला ८३९ पॉईंटसह आपले दुसरे स्थान टिकवून ठेवता आले आहे.
बुमराह अव्वलस्थानी कायम
डेथओव्हर स्पेशालिस्ट असलेला जसप्रीत बुमराहने बॉलर्सच्या यादीतील पहिले स्थान कायम राखले आहे. बुमराहचे एकूण ७७४ पॉईंट आहेत. बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ५ वनडेमध्ये अनुक्रमे २, २, ०, ३ आणि ० अशा विकेट घेतल्या. तसेच चौथ्या वनडे मध्ये बुमराहने इनिंगच्या शेवटच्या बॉलवर मारलेला सिक्स चांगलाच चर्चेत राहिला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज गमावली असली तरी भारतीय टीम या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. १२३ पॉईंटसह इंग्लंडची टीम पहिल्या क्रमांकावर आणि १२० पॉईंटसह भारताची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका ११२ पॉईंटसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. काही अंशांनी न्यूझीलंडचे पॉईंट जास्त असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताविरुद्धची सीरिज जिंकलेली ऑस्ट्रेलिया १०३ पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे.