मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. इंग्लंडनंतर त्याला आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही विश्रांती देण्यात आली आहे. त्यात आता आगामी टी20 वर्ल्डकप आणि एशिया कपमध्ये संधी देण्यात येणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. या दरम्यान एका बोर्डाच्या अधिकाऱ्याने बीसीसीआय आणि विराट कोहलीवर मोठं विधान केलं आहे. या विधानाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड़कपनंतर विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले होते. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याच्याकडून एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद काढून घेतले होते.
या दोन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले होते. 


दोन्ही कर्णधारपद काढून घेतल्यानंतर मीडियामध्ये बीसीसीआय कोहलीशी चांगले वागत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतरच या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. आणि इथुनच बीसीसीआय कोहलीशी चांगले वागत नसल्याच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. 


या सर्व मुद्द्यावर भारतीय मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी खुलासा करताना सांगितले की,  हे चुकीचे आहे. कोहलीने स्वतः कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, असे त्यांनी सांगितले. 


अरुण धुमाळ यांनी क्रीडा पत्रकार विमल कुमार यांना त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, विराट कोहली सामान्य खेळाडू नाही. त्यांने भारतीय क्रिकेटला मोठे योगदान दिले आहे.  विराटने लवकरात लवकर फॉर्ममध्ये यावे अशी आमची इच्छा आहे. कर्णधार पद सोडण्याचा देखील कोहलीचाच निर्णय होता. इथे कोहलीला कर्णधारपद सोडायचे होते. तो पूर्णपणे त्याचा निर्णय होता. आम्ही त्याचा आदर केला. प्रत्येक क्रिकेट बोर्ड त्याचा आदर करतो. 


दरम्यान बीसीसीआय आणि विराट कोहलीत कुठल्याही प्रकारचे वाद नव्हते, हे या बातमीतून तर समोर आलेच आहे. मात्र या प्रकरणावर विराटची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर या वादावर पडदा पडणार आहे.