विराटचं असंही रेकॉर्ड, ३८ मॅचमध्ये केले ३८ बदल
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा तब्बल २०९ रननी विजय झाला.
नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा तब्बल २०९ रननी विजय झाला. पहिल्या २ टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर या मॅचमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-१नं पिछाडीवर आहे. पण याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीचं आणखी एक रेकॉर्ड समोर आलं आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीनं ३८ टेस्ट मॅचमध्ये टीममध्ये तब्बल ३८ बदल केले. टीममध्ये एवढे बदल करणं योग्य नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण प्रत्येक कर्णधार वेगळा असतो आणि टीमची आवश्यकताही वेगळी असते. परिस्थितीनुसार खेळाडूंची निवड होते, अशी प्रतिक्रिया हरभजन सिंग यानं दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये भारत सीरिज जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता. तर इंग्लंडमध्ये भारतानं पुनरागमन केलं आहे. जर कर्णधाराला यावर विश्वास असेल आणि खेळाडूंनाही तक्रार नसेल तर काहीच फरक पडत नाही, असं हरभजन म्हणाला.
इंग्लंडमध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी विराटनं प्रचंड मेहनत घेतली आहे. इंग्लड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये अशी बॅटिंग करणं कठीण असतं. विराट मॅच जिंकण्यासाठी खेळतो आणि त्यामुळे काही वेळा मॅच गमावण्याचाही धोका असतो. पण अशावेळी बहुतेकवेळा तुम्हाला विजयच मिळतो, असं म्हणत हरभजननं विराटचं कौतुक केलं आहे.