लंडन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला विस्डनने त्यांच्या दशकातल्या टॉप-५ क्रिकेटपटूंच्या यादीत समाविष्ट केलं आहे. विराटसोबतच या यादीत स्टीव्ह स्मिथ, डेल स्टेन, एबी डिव्हिलियर्स आणि एलाईज पेरी यांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी विस्डनने विराटची दशकातल्या वनडे आणि टेस्ट टीममध्येही विराटची निवड केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आव्हानांचा सामना करत विराट पुढे गेला आहे. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यापासून ते यावर्षी कोलकात्यात झालेली बांगलादेश डे-नाईट टेस्टपर्यंत विराटने ६३ च्या सरासरीने २१ शतकं आणि १३ अर्धशतकं केली आहेत', असं विस्डनने सांगितलं. 


विराट हा एकमेव खेळाडू आहे, ज्याची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधली सरासरी ५० पेक्षा जास्त आहे. स्टीव्ह स्मिथनेही विराटसारखा खेळाडू नाही, असं वक्तव्य केलं होतं. सचिनच्या निवृत्तीनंतर आणि धोनी हळू हळू मागे हटल्यानंतर आलेल्या दबावात जगातला कोणताच क्रिकेटपटू खेळू शकला नाही.


आयसीसीनेही विराटच्या या दशकातल्या कामगिरीची दखल घेतली आहे. २०१०-२०१९ या दशकात विराटने इतर खेळाडूंपेक्षा ५,७७५ रन आणि २२ शतकं जास्त केली आहेत.



२०१९ साली विराटने क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये ६४.५० च्या सरासरीने २,३७० रन केले आहेत. लागोपाठ चौथ्या वर्षी विराटने एका वर्षात २ हजारांपेक्षा जास्त रन करण्याचा विक्रम केला आहे. याआधी विराटला विस्डनने टेस्ट टीमचा कर्णधार बनवलं आहे. तसंच वनडे टीममध्येही विराटची निवड केली आहे. विराटशिवाय धोनी आणि रोहित शर्मालाही विस्डनच्या टीममध्ये जागा मिळाली.


विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीची सुरुवात २००८ साली, टी-२० कारकिर्दीची सुरुवात २०१० साली आणि टेस्ट क्रिकेटची सुरुवात २०१२ साली केली. विराटने ८४ टेस्टमध्ये ५४.५७ च्या सरासरीने ७,२०२ रन आणि २७ शतकं, २४२ वनडेमध्ये ४३ शतकांसोबत ५९.८४ च्या सरासरीने १२,२४५ रन आणि ७५ टी-२०मध्ये ५२.६६ च्या सरासरीने २,६३३ रन केले आहेत.