मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी कॅप्टन विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. बीसीसीआयनंही विराटला इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळायला परवानगी दिली आहे. २०१४ साली झालेल्या इंग्लंड दौरा विराटसाठी फारसा चांगला नव्हता. विराटनं ५ टेस्टमध्ये १३.४०च्या सरासरीनं १३४ रन्स केल्या होत्या. यंदाच्या दौऱ्यामध्ये चांगली कामगिरी व्हावी म्हणून मी काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार असल्याचं विराट कोहली म्हणाला आहे. इंग्लंडमधल्या वातावरणामध्ये रुळायला जास्त संधी मिळण्यासाठी काऊंटी क्रिकेट खेळणं महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.


कोणत्या टीमकडून खेळणार विराट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काऊंटीमध्ये विराट कोहली सरे कडून खेळेल असं बोललं जात होतं, पण याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. आयपीएल संपल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये विराट कोहली इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी खेळेल. त्यामुळे जूनमध्ये भारतात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये विराट खेळू शकणार नाही.


भारताचे दोन खेळाडू इंग्लंडमध्ये


चेतेश्वर पुजारा आणि ईशांत शर्मा हे दोन्ही भारतीय खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहेत. पुजारा यॉर्कशायरकडून तर ईशांत ससेक्सच्या टीममध्ये आहे. वारविकशायरविरुद्धच्या मॅचमध्ये ईशांत शर्मानं ५ विकेट घेतल्या आहेत.


आफ्रिकेतली चूक सुधारणार


दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारत एकही सराव सामना खेळला नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. पुरेसा सराव न मिळाल्यामुळे भारताचा पराभव झाल्याची टीका यावेळी झाली होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली ही चूक सुधारण्यासाठी भारतीय टीममधले खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये जाऊन सराव करत आहेत.


असा आहे इंग्लंड दौरा


इंग्लंड दौऱ्यामध्ये भारत ३ टी-20, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅच खेळणार आहे. टेस्ट सीरिजआधी भारत इसेक्सविरुद्ध चेल्म्सफोर्डमध्ये ४ दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. ५ टेस्ट मॅचची सीरिज १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. २०१४ साली पहिल्या २ टेस्ट मॅचनंतर भारत १-०नं पुढे होता. लॉर्ड्सवर झालेली ऐतिहासिक टेस्ट भारत जिंकला होता. यानंतरही भारतानं टेस्ट सीरिज ३-१नं गमावली होती.