विराटचा धोनीला सलाम; म्हणाला ती रात्र कधीच विसरणार नाही
विराट कोहलीला धोनीबद्दल किती आदर आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे.
मुंबई : विराट कोहलीला धोनीबद्दल किती आदर आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. विराटने सोशल नेटवर्किंगवर त्याचा आणि धोनीचा एक फोटो शेयर करुन पुन्हा एकदा याचा प्रत्यय आणून दिला आहे. २०१६ सालच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मॅचचा हा फोटो आहे. हा फोटो शेयर करताना विराट म्हणाला, 'मी ही मॅच कधीच विसरू शकत नाही. ती रात्र खूप खास होती. या माणसाने मला फिटनेस टेस्ट असल्यासारखं पळवलं.'
मॅच संपल्यानंतरच्या या फोटोमध्ये विराट धोनीसमोर गुडघ्यावर बसला आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी १६१ रनचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने ५ बॉल शिल्लक असताना आणि ६ विकेट राखून पूर्ण केलं.
या मॅचमध्ये विराटने ५१ बॉलमध्ये ८२ रन केले. विराटची टी-२० क्रिकेटमधली ही सर्वोत्तम खेळी समजली जाते. धोनी आणि कोहली यांच्यात ३१ बॉलमध्ये ६७ रनची पार्टनरशीप झाली.
विराटने सोशल नेटवर्किंगवर हा फोटो शेयर केल्यामुळे अनेकांनी धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे आणि याबाबत विराटला सांगितल्याचा अंदाज वर्तवला आहे. पण याबाबत अजून कोणाकडूनही स्पष्टीकरण मिळालेलं नाही.
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर धोनीने एकही मॅच खेळलेली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी धोनी लष्करी सेवेत होता, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीची निवड झालेली नाही.