पराभवानंतर कोहलीने केले पांड्याचे कौतुक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीने यासाठी फलंदाजांना जबाबदार ठरवलेय.
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीने यासाठी फलंदाजांना जबाबदार ठरवलेय. विराट कोहली म्हणाला, दुसऱ्या डावात कोणताच फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि चांगली भागीदारी न झाल्याने पराभव पदरी पडला.
कोहली पुढे म्हणाला, आम्ही साधारण ७० धावांनी हरलो. जर आम्ही पहिल्या डावात संधी गमावल्या नसत्या तर २२०च्या आसपास धावा करु शकलो असतो. ठराविक अंतराने विकेट गमावल्याने आमची स्थिती खराब झाली. आम्ही तीन दिवस सामन्यांत होतो आणि हा चांगला सामना झाला.
खेळपट्टीने केले भारतीय गोलंदाजांना त्रस्त
कोहली म्हणाला, हा चांगला प्रयत्न होता. मात्र कोणालातरी ७५ ते ८० धावा करण्याची गरज होती. २० वा ३० धावा पुरेशा नाहीत. त्यांच्याकडे एक गोलंदाज कमी होता. मात्र त्यानंतरही त्यांनी योग्य टप्प्यात गोलंदाजी केली. आम्हाला आमच्या चुका सुधारण्याची गरज आहे. भारताकडून पहिल्या डावात हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्यात आठव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली.
कोहलीकडून पांड्याचे कौतुक
द. आफ्रिकेच्या सामन्यानंतर कोहलीने पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. या सामन्यात चांगली भागीदारी होणे गरजेचे होते. त्यांनी आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली. पांड्याचे कौतुक करताना विराट म्हणाला, आम्हाला पांड्यावर विश्वास आहे. आपल्या भूमीवर असो वा परदेशात त्याचे नेहमीच चांगली कामगिरी करण्याला प्राधान्य असते. पहिल्या डावात त्याची खेळी उत्कृष्ट होती.