कटप्पाने बाहुबलीला का मारलं? विराटच्या फॅन्सचा BCCI ला सवाल
विराट कोहलीला वन डे कर्णधारपदावरुन काढल्याने त्याचे चाहते संतप्त झाले आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या जागी रोहित याला ही कमान देण्यात आली.
बीसीसीआयने काल ही मोठी घोषणा केली. पण विराटला एकदिवसीय संघाची कमान सोडायची नव्हती आणि बीसीसीआयने (BCCI) त्याच्याकडून कर्णधारपद बळजबरीने काढून घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विराटचे फॅन्स चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडियावर विराटच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे.
कोहलीला कर्णधारपदावरुन हटवलं
भारताच्या दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकानंतर भारतीय T20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माला T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. यानंतर आता बीसीसीआयने रोहितची वनडे कर्णधारपदीही नियुक्ती केली आहे.
विराटच्या नेतृत्त्वात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली, ज्यामुळे टीम इंडियायाकडे भविष्यात अनेक पर्याय उपलब्ध झाले. विराटच्या आक्रमक शैलीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे, त्यामुळे त्याचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. कोहलीला अचानक कर्णधारपदावरून हटवल्यामुळे त्याचे चाहते संतापले असून बीसीसीआयवर टीका करत आहेत. ट्विटरवर #ShameonBCCI हा ट्रेंड व्हायरल झाला आहे.
कर्णधार म्हणून कोहलीची 'विराट' कामगिरी
कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने क्रिकेटच्या तीनही प्रकारात 'विराट' कामगिरी केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 95 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात 65 विजय आणि 27 पराभव स्विकारले आहे तर एक सामना बरोबरीत आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने मालिका जिंकल्या आहेत.
असं असलं तरी कोहलीला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर टी-20 विश्वचषकातही साखळीतच भारताचा गाशा गुंडाळावा लागला.
फलंदाजीतही अनेक विक्रम
विराट कोहली हा जगातील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 50 सामने जिंकणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचे चाहते त्याला प्रेमाने चेस मास्टर म्हणतात. कोहलीने भारताकडून खेळताना 97 कसोटीत 7801 धावा, 254 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12169 धावा आणि 95 टी-20 सामन्यांमध्ये 3227 धावा केल्या आहेत.