मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंची पत्नी किंवा गर्लफ्रेंडना परदेश दौऱ्यात खेळाडूंसोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं बीसीसीआयकडे केली होती. बीसीसीआयनं विराटचा हा प्रस्ताव मान्य केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या प्रशासकांच्या समितीनं या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. प्रशासक समितीचे सदस्य डायना एडुल्जींनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मीडियामध्ये आलेल्या या बातम्या चुकीच्या आहेत, असं डायना एडुल्जींनी स्पष्ट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या प्रस्तावानंतर खेळाडूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड परदेश दौऱ्याच्या सुरुवातीच्या १० दिवस टीमसोबत नसतील पण उरलेल्या दौऱ्यात त्यांना खेळाडूंसोबत राहायला परवानगी मिळेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.


बीसीसीआयच्या नियमांनुसार परदेश दौऱ्यात पत्नी किंवा गर्लफ्रेंड खेळाडूसोबत १५ दिवस राहू शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी २०१५ साली पत्नी किंवा गर्लफ्रेंड दौऱ्यावर असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंची कामगिरी खराब होत असल्याचा आक्षेप घेतला होता. त्यावेळी बीसीसीआयनं सदरलँड यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं होतं.


नियमांमध्ये एकसारखे बदल


इंग्लंड दौऱ्याच्या आधी क्रिकेटपटू संपूर्ण परदेश दौरा त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत राहू शकत होते. इंग्लंड दौऱ्यात वनडे सीरिजनंतर आणि टेस्ट सीरिजआधी भारतीय खेळाडू पत्नींसोबत एन्जॉय करताना दिसले. टी-२० सीरिज जिंकल्यानंतर आणि वनडे सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयनं खेळाडूंना पत्नी किंवा गर्लफ्रेंडपासून लांब राहायला सांगितलं. यानंतर परदेश दौऱ्याचे सुरुवातीचे १४ दिवस पत्नी किंवा गर्लफ्रेंड खेळाडूंसोबत असणार नाही, असा नवा नियम बीसीसीआयनं केला.