ऑकलंड : भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला शुक्रवारपासून सुरुवात होते आहे. या दौऱ्यात भारत ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर या दोन्ही टीम पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारत न्यूझीलंडविरुद्ध घेणार का? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. त्यावेळी विराटने मजेशीर उत्तर दिलं. ही लोकं एवढी चांगली आहेत, की आम्ही बदला घेण्याचा विचारही करु शकत नाही, असं विराट म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जेव्हा न्यूझीलंडचा प्रवेश झाला तेव्हा आम्हाला आनंद झाला होता, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. हे वर्ल्ड कपचं वर्ष आहे, त्यामुळे प्रत्येक टी-२० मॅच महत्त्वाची आहे. आम्ही विचलित होऊ शकत नाही. प्रत्येक टी-२० मॅचला आम्ही गांभिर्याने घेत आहोत, असं विराटने सांगितलं.


रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुमध्ये तिसरी वनडे मॅच खेळल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय टीम न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाली. टीम इंडियाच्या या कार्यक्रमावर विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयने ट्रॅव्हल प्लानवर पुन्हा विचार करावा, असा सल्ला विराट कोहलीने दिला आहे.


जेव्हा परदेश दौरा असतो तेव्हा वेळापत्रक थोडं सुटसुटीत असायला पाहिजे. थेट स्टेडियममध्ये जायला घाई होत आहे. भारतीय वेळेनुसार हे ठिकाण साडेसात तास पुढे आहे, अशात स्वत:ला ढाळून घेणं कठीण होतं, असं विराट म्हणाला. भविष्यात या गोष्टींवर लक्ष दिलं जाईल, अशी अपेक्षा विराटने व्यक्त केली आहे.