मुंबई : एकेकाळी तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी क्रमवारीत अधिराज्य गाजवणारा विराट कोहली आता खराब फॉर्ममुळे खाली घसरलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोहलीला एक स्थान गमवावं लागलं असून तो तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. 2015 नंतर प्रथमच किंग कोहली एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या 3 मधून बाहेर पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर कोहलीच्या क्रमवारीत ही घसरण झालीये. कोहलीने मांडीच्या दुखापतीमुळे पहिला एकदिवसीय सामना खेळला नसला तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला अनुक्रमे 16 आणि 17 रन्स करता आले. वनडे व्यतिरिक्त कोहलीला कसोटी क्रमवारीतही खूप फटका बसला आहे.


कोहली 2016 नंतर प्रथमच टॉप 10 मधून बाहेर


इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत 2016 नंतर प्रथमच कोहली पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. एजबॅस्टन टेस्ट सामन्यात दोन्ही डावात कोहलीने केवळ 31 रन्स केले. त्यावेळी भारताने हा सामना 7 गडी राखून गमावला. आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहली 12व्या स्थानावर आहे.


दुसरीकडे, जर आपण त्याच्या T20 क्रमवारीबद्दल बोललो तर तो 24 व्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही कोहलीची कामगिरी विशेष झाली नाही. कोहलीने दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे 1 आणि 11 रन्स केले होते.


कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळणार नाही


विराट कोहलीच्या सांगण्यावरून बीसीसीआयने त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती दिलीये. टीम इंडियाला विंडीज दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर भारताला झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायचीये.