मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७ विकेटने दणदणीत विजय झाला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. विराट कोहलीच भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिले मोक्याच्या क्षणी क्विंटन डिकॉकचा कॅच पकडून आणि मग अर्धशतकी खेळी करुन विराटने भारताला जिंकवून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओपनिंगला बॅटिंगसाठी आलेल्या क्विंटन डिकॉकने ३७ बॉलमध्ये ५२ रनची खेळी केली. क्विंटन डिकॉक दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल, असं वाटत असतानाच विराटने नवदीप सैनीच्या बॉलिंगवर जबरदस्त कॅच पकडला. डिकॉक आऊट झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ११.२ ओव्हरमध्ये २ विकेटवर ८८ रन होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये १४९/५ पर्यंत मजल मारता आली.



दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९ ओव्हरमध्ये केला. विराटने ५२ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. विराटचं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधलं हे २२वं अर्धशतकं होतं. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रोहितचा विक्रमही विराटने मोडला आहे. विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २४४१ रन आहेत, तर रोहितने २,४३४ रन केले आहेत.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा घरच्या मैदानातला टी-२० क्रिकेटमधला भारताचा हा पहिलाच विजय होता. याआधी २०१५ साली भारत दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेचा २-०ने विजय झाला होता.