सेंच्युरियन : घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे क्रिकेटर द. आफ्रिकेत सपशेल अपयशी ठरतायत. आधी केपटाऊनमध्ये आणि आता सेंच्युरियन भारताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. यामुळेच दोनही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताने तीन सामन्यांची मालिकाही गमावलीये.


हे आकडे आहेत साक्षीदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द. आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या दोन कसोटी सामन्यांतील चार डावांत भारताने एकूण ८०२ धावा केल्या. केपटाऊनमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील दोन डावांमध्ये भारतीय संघाने ३४४ धावा केल्या. हीच अवस्था भारताची सेंच्युरियनमध्ये पाहायला मिळाली. द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दोन डावांत भारताने एकूण ४५८ धावा केल्या.


विजय समोर होता आणि ढेपाळला संघ


द. आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या जवळ विजय होता मात्र त्यांना तो मिळवता आला नाही. पहिल्या सामन्यांत जिंकण्यासाठी २८७ धावांची आवश्यकता होती तर सेंच्युरियनमध्ये जिंकण्यासाठी २०८ धावा हव्या होत्या. मात्र ऐन वेळेस संघ ढेपाळला आणि भारताला पराभवाचा धक्का बसला.


फलंदाजांनी केले निराश


बुधवारी द. आफ्रिकेच्या आक्रमक गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. येथील दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला १३५ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. यासोबतच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग ९ कसोटी मालिकांमध्ये अपराजित राहण्याच्या विक्रमाला या पराभवामुळे ब्रेक लागला. द. आफ्रिकेने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये.