भारतीय प्रेक्षकांनी उडवली स्टीव्ह स्मिथची खिल्ली; विराट कोहली म्हणाला..
मी भारतीय प्रेक्षकांच्यावतीने स्मिथची माफी मागतो.
लंडन: एरवी आपल्या आक्रमक स्वभावामुळे कायम टीकेचा धनी होणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या एका कृतीने अनेकांची मते जिंकून घेतली. या सामन्यात भारताची फलंदाजी सुरु असताना स्टीव्ह स्मिथ सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. यावेळी काही भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्रे उडवली. त्यावेळी विराट कोहलीने फलंदाजी थांबवून भारतीय प्रेक्षकांच्या दिशेने हात उंचावून या प्रकाराविषयी नापसंती व्यक्त केली. तसेच स्मिथची खिल्ली उडवण्याऐवजी त्याला प्रोत्साहन द्या, असेही इशाऱ्याने सांगितले.
२०१८ मध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यामुळे भारतीय प्रेक्षक त्याला 'चिटर चिटर' अशा घोषणा देऊन डिवचत होते.
या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला या घटनेविषयी विचारण्यात आले. त्यावेळी कोहलीने म्हटले की, जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. स्मिथने त्याची चूक मान्य करून शिक्षाही भोगली आहे. आता त्याने पुनरागमन केले असून तो स्वत:च्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. अशावेळी त्याच्यावर वारंवार टीका करणे, योग्य नाही. भारतीय प्रेक्षकांच्या कृतीने चुकीचा पायंडा पाडू नये, असे मला वाटते. त्यामुळे मी भारतीय प्रेक्षकांच्यावतीने स्मिथची माफी मागतो, असे कोहलीने सांगितले.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना ३६ धावांनी जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५२ धावा केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाला ३१६ धावाच करता आल्या. विश्वचषकात आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा १९९९ नंतरचा हा पहिलाच पराभव आहे. १९९९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना लागोपाठ १९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.