नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना अपेक्षेप्रमाणे यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच खेलरत्न पुरस्कारासाठी या दोघांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहलीने भारतीय संघासाठी खोऱ्याने धावा केल्या आहेत. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने क्रीडा जगाततील सर्वोच्च पुरस्काराला गवसणी घातली आहे. भारतीय आणि परदेशी खेळपट्ट्यांवर विराटने आपले नाणे खणखणीत असल्याचेही सिद्ध केले आहे. याशिवाय, महेंद्रसिंग धोनीनंतर विराटने टीम इंडियाचे यशस्वीपणे नेतृत्त्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याला कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळाला होता.


तर मीराबाई चानू हिनेदेखील नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर २०१७ मध्ये तिने  जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती. २२ वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.