मुंबई : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. पहिल्या फेरीत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा धक्का लागला. यानंतर आता टीम इंडिया पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध ३ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या तिन्ही सीरिजमध्ये विराट कोहली खेळणार असल्याचं वृत्त आता समोर येत आहे. याआधी विराट टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये आराम करेल, असं सांगण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली मागच्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट खेळत आहे. पहिले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा, त्यानंतर आयपीएल आणि मग वर्ल्ड कप असे मागचे ८ ते ९ महिने विराट क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे विराटला आराम द्यायच्या चर्चा सुरु होत्या.


वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे विराट दु:खी आहे. म्हणून पुन्हा एकदा लवकरात लवकर विराटला नव्याने सुरुवात करायची आहे. त्यासाठी विराटने आपण पूर्णपणे फिट असून या दौऱ्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती विराटने बीसीसीआयला दिली आहे. विराटसोबतच रोहितही या दौऱ्यासाठी जाणार आहे.


धोनीबद्दल मात्र अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही. धोनीने टेस्ट क्रिकेटमधून आधीच संन्यास घेतला आहे. तसंच टी-२० मध्ये आता धोनीला संधी मिळणं कठीण दिसत आहे. याचे संकेत निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-२० सीरिजदरम्यान दिले होते. त्यामुळे वनडे सीरिजसाठी धोनीची निवड होणार का? हा मोठा प्रश्न आहे. 


वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीतून हार्दिक पांड्या सावरत आहे. चक बुमराहला टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये आराम दिला जाऊ शकतो. पण टेस्ट टीममध्ये बुमराह पुनरागमन करेल.