नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यामुळे भारतीय टीमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एनआयएला मिळालेल्या एका निनावी पत्रामध्ये कर्णधार विराट कोहलीसह भारतीय टीमला धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय टीमवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भीती या पत्रात वर्तवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रामध्ये अनेक बडी नावं आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट टीम, विराट कोहली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, जे.पी.नड्डा आणि मोहन भागवत यांच्या नावांचा समावेश आहे.


एनआयएने या धमकीच्या पत्राबाबत बीसीसीआयलाही माहिती दिली आहे. केरळच्या कोजीकोडची ऑल इंडिया लष्कर ही संघटना देशातल्या या प्रमुख व्यक्तींवर हल्ला करू शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे.


एनआयएला मिळालेलं धमकीचं पत्र हे खोटंही असू शकतं, पण आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे मॅचचं ठिकाण आणि खेळाडूंच्या सुरक्षेची माहिती घेतली जात आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं. 


भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ३ टेस्ट आणि २ टी-२० मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबरला दिल्लीत पहिली टी-२०, दुसरी टी-२० राजकोटमध्ये आणि तिसरी टी-२० नागपूरमध्ये होणार आहे. तर पहिली टेस्ट मॅच इंदूरमध्ये आणि दुसरी टेस्ट मॅच कोलकात्यात खेळवली जाईल.