केनसोबत क्रिकेटवर नाही तर वेगळ्या गोष्टींवर चर्चा, विराटचा खुलासा
या फोटो क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला होता.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २१ फेब्रुवारीपासून टेस्ट सीरीजला सुरवात होत आहे. यासाठी भारतीय टीम सज्ज आहे. पण याआधी भारतीय टीमच्या सर्व खेळाडूंना भारतीय उच्चायोग येथे पोहोचले होते. भारतीय उच्चायोगाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विराट कोहलीने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. त्याने म्हटलं की, 'न्यूझीलंडची टीम नेहमी चांगल्या भावनेने क्रिकेट खेळते. जर भारताला पहिला नंबर जर कोणासोबत शेअर करावा लागला तर ते न्यूझीलंड सोबत शेअर करतील.'
भारतीय टीम टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड टीम सहावा स्थानावर आहे. विराट कोहलीने भारतीय उच्चायोग येथे म्हटलं की, आम्हाला वनडे सीरीजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण आम्ही टेस्ट सीरीजसाठी तयार आहोत. या सोबतच विराट आणि विलियमसन बाऊंड्री लाईनच्या पलीकडे बसून काय बोलत होते हे देखील सांगितलं.
विराटने म्हटलं की, जेव्हा आम्ही एकत्र बसलो होतो. तेव्हा आम्ही सामन्याबद्दल बोलत नव्हतो. आता आपण त्या स्तरावर पोहोचलो आहे. जेथे प्रत्येक टीम आपल्याया पराभूत करण्याचा विचार करते. न्यूझीलंड पण यामध्ये मागे नाही. पण फरक इतकाच आहे की, यांच्यामध्ये कोणताही द्वेष नाही. यामुळेच मी केनसोबत बसून क्रिकेटवर नाही तर जीवनातील इतर गोष्टींबद्दल गप्पा मारत होतो.'
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेव्हा 'कांटे की टक्कर' सुरु होती. तेव्हा एक वेगळंच चित्र मैदानावर पाहायला मिळालं. (India vs New Zealand) टी20 सीरीजमधली ही गोष्ट नेहमी आठवणीत राहिल. भारताने टी20 सीरीज 5-0 ने जिंकली आणि इतिहास रचला होता. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघाचे कर्णधार खेळत नव्हते. पण दोघेही एकत्र बसून सामन्याचा आनंद घेत होते. विराट कोहली आणि केन विलियम्सन यांचा हा फोटो चर्चेचा विषय ठरला होता.