नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. विराट कोहलीचं द्विशतक आणि रोहित शर्माच्या शतकामुळे भारतानं ६१०/६ वर डाव घोषित केला आहे. विराट कोहली २१३ रन्सची मॅरेथॉन इनिंग करून आऊट झाला तर रोहित शर्मानं नाबाद १०२ रन्स बनवल्या. विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पाचवं द्विशतक आहे. तर रोहित शर्माचं टेस्ट क्रिकेटमधलं तिसरं शतक आहे. विराट कोहलीनं २६७ बॉल्समध्ये २१३ रन्स केल्या. विराटच्या या खेळीमध्ये १७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्मानं १६० बॉल्समध्ये नाबाद १०२ रन्स केल्या. रोहितनं ८ फोर आणि एक सिक्स मारली.


४ बॅट्समनचं शतक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६१० रन्स बनवल्यामुळे भारताकडे आता तब्बल ४०५ रन्सची आघाडी आहे. या इनिंगमध्ये भारताकडून मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा या चार बॅट्समननी शतकी खेळी केली. एकाच इनिंगमध्ये चार भारतीय बॅट्समननी शतक झळकावायची ही तिसरी वेळ आहे. 


गावस्कर यांचे रेकॉर्ड विराटनं मोडलं


विराटची आंतरराष्ट्रीय कारकिरीर्दीमधील हे ५१वं शतक आहे. विराटने १३० बॉल्समध्ये १० फोर लगावत शतक पूर्ण केलं. विराटनं वनडेमध्ये ३२ तर टेस्टमध्ये १९ शतकं झळकावली आहेत. कॅप्टन म्हणून सर्वाधिक ११ शतकांचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर होत्या.


गावस्करांच्या या रेकॉर्डची बरोबरी विराटने कोलकाता टेस्ट मॅचमध्ये केली होती. मात्र, आता नागपूर टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एक शतक लगावत विराटने गावस्करांनाही मागे टाकलं आहे. या यादीमध्ये विराट, गावस्कर यांच्यानंतर नाव आहे ते म्हणजे मोहम्मद अझहरुद्दीन यांचं. अझहरुद्दीननं कॅप्टन असताना ९ टेस्ट शतकं केली होती.