वर्ल्ड कपसाठी आयपीएलमध्ये खेळाडूंना विश्रांती? विराट-रोहितमध्ये मतभेद
२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमनं जोरदार तयारी सुरु केली आहे.
मुंबई : २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमनं जोरदार तयारी सुरु केली आहे. वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता आयपीएलमध्ये फास्ट बॉलरना विश्रांती देण्यात यावी. यामुळे फास्ट बॉलर वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त राहतील, असं विराटचं म्हणणं आहे. पण विराट कोहलीचं हे मत रोहित शर्माला मात्र पटलेलं नाही. जर मुंबईची टीम आयपीएल फायनल किंवा प्ले ऑफमध्ये गेली आणि त्यावेळी बुमराह फिट असेल तर त्याला टीममध्ये न घेणं आम्हाला परवडणारं नाही, असं रोहित शर्मा म्हणाल्याची बातमी पीटीआयनं दिली आहे.
विराट कोहलीचं हे मत फ्रॅन्चायजीनाही पटेल असं दिसत नाही. सध्या जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे भारतीय टीममधले दोन प्रमुख फास्ट बॉलर आहेत. आयपीएलमध्ये बुमराह मुंबईकडून तर भुवनेश्वर कुमार हैदराबादकडून खेळतो.
यावर्षी पाठीच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला आयपीएलमधल्या काही मॅच खेळता आल्या नाहीत. यानंतर भारताच्या इंग्लंड दौऱ्यामध्येही भुवनेश्वरला काही मॅचना मुकावं लागलं होतं. या दुखापतीमुळे मग इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भुवनेश्वर कुमारची भारतीय टीममध्ये निवड झाली नव्हती.
तर जसप्रीत बुमराह यावर्षी आयपीएलच्या सगळ्या १४ मॅच खेळला होता. यानंतर आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० दरम्यान बुमराहच्या बोटाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे बुमराह इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे टीममध्ये नव्हता. पहिल्या २ टेस्ट मुकल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये बुमराहचं पुनरागमन झालं.
बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्ट आणि पहिल्या दोन वनडेसाठी आराम देण्यात आला होता.
२०१९ सालचं आयपीएल २९ मार्चला सुरु होणार आहे. तर फायनल १९ मे रोजी होईल. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत पहिली मॅच खेळेल.