लंडन : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत. १ ऑगस्टपासून या सीरिजची पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. पण या सीरिजआधी भारताचा भरवशाचा खेळाडू आणि कर्णधार विराट कोहलीची इंग्लंडमधली कामगिरी चिंतेचा विषय आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात खोऱ्यानं रन काढणाऱ्या विराटला इंग्लंडमध्ये संघर्ष करावा लागला आहे. विराट कोहलीचं इंग्लंडमधलं रेकॉर्ड पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल. इंग्लंडमध्ये विराट कोहलीपेक्षा भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्राचं रेकॉर्ड चांगलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताचा ३-१नं पराभव झाला होता. या सीरिजमध्ये कोहलीनं ५ मॅचमध्ये १३.४० च्या सरासरीनं १३४ रन केले. यातल्या २ वेळा कोहली शून्य रनवर आऊट झाला. याच सीरिजमध्ये भुवनेश्वर कुमारनं २७.४४ च्या सरासरीनं २४७ रन केले. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.


भुवनेश्वर कुमारच नाही तर अमित मिश्रानंही इंग्लंडमध्ये विराटपेक्षा जास्त रन केले आहेत. २०११ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये अमित मिश्रा भारतीय टीममध्ये होता. या सीरिजच्या २ मॅचमध्ये मिश्रानं ३८.२५ च्या सरासरीनं १५३ रन केले होते. यामध्ये एक अर्धशतक होतं.