भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. गौतम गंभीर सध्या आशिया कप 2023 साठी समालोचन करत आहे. याचदरम्यान भारत आणि नेपाळमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या एका कृत्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. संतापलेल्या गौतम गंभीरने चाहत्यांना मिडल फिंगर दाखवत आक्षेपार्ह कृत्य केलं. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता विरेंद्र सेहवाग याने केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. चाहत्याने गौतम गंभीरचा उल्लेख केल्यानंतर सेहवागने असं काही विधान केलं ज्यामुळे सगळीकडे चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान गौतम गंभीरने स्पष्टीकरण देताना चाहत्यांमध्ये काही पाकिस्तानी नागरिक होते, जे भारतविरोधी घोषणा देत होते. ते काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याने त्यांना मी हा इशारा दिला असा दावा केला आहे. गौतम गंभीर हा दिल्लातून भाजपाचा खासदारही आहे. 


गौतम गंभीर वादात अडकलेला असतानाच आता विरेंद्र सेहवागनेही त्यात उडी घेतल्याचं दिसत आहे. विरेंद्र सेहवागने थेट गौतम गंभीरचा उल्लेख केला नसला, तरी त्याचा संदर्भ मात्र तोच होता. त्यामुळे सेहवागने हे विधान करत थेट गौतम गंभीरशी पंगा घेतल्याचं बोललं जात आहे. कारण सेहवागने राजकारणात उतरणारे खेळाडू अहंकार आणि सत्तेच्या लालसेपोटी हे करत असल्याचं म्हटलं आहे. 


नेमकं काय झालं?


ट्विटरला एका युजरने विरेंद्र सेहवगाला टॅग करत करत म्हटलं की, मला नेहमी वाटतं की गौतम गंभीरच्या आधी तू खासदार व्हायला हवं होतं. या चाहत्याला उत्तर देताना विरेंद्र सेहवागने राजकारणावर आपलं मत मांडलं. 


विरेंद्र सेहवागने म्हटलं की, "मला राजकारणात अजिबात रस नाही. मागली दोन निवडणुकांमध्ये दोन मोठ्या पक्षांनी मला विचारणा केली होती. पण माझ्या मते मनोरंजन करणारे आणि खेळाडू यांनी राजकारणात प्रवेश करु नये. याचं कारण यातील अनेकजण हे फक्त आपला अहंकार आणि सत्तेची भूक मिटवण्यासाठी राजकारणात जातात. लोकांसाठी त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो. काही अपवाद वगळता इतरजण फक्त आपला प्रचार करत असतात". 



"मला क्रिकेटमध्ये गुंतून राहण्यास, समालोचन करण्यास आवडतं. आपल्या सोयीप्रमाणे पार्ट टाइम खासदार होणं ही माझी कधीच इच्छा नव्हती," असंही सेहवागने म्हटलं आहे. 


गौतम गंभीर नेमका वादात का अडकला आहे?


गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गौतम गंभीर भारत आणि नेपाळ सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे जाताना दिसत आहे. यानंतर काही चाहते कोहली आणि धोनीचं नाव घेत घोषणा देण्यास सुरु करतात. त्यावर गौतम गंभीर त्यांना मिडल फिंगर दाखवतो. 


यानंतर गंभीरने स्पष्टीकरण देताना सांगितले की, 'पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर जे दाखवले जाते ते खरे नाही. तिथे लोक त्यांच्या बाजूने जे दाखवायचे ते दाखवतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधले सर्वात मोठे सत्य हे आहे की, त्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या, हिंदुस्तान मुर्दाबाद किंवा काश्मीरबद्दल घोषणा दिल्या, तर ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देईल किंवा मग तो हसून निघून जाईल". 



"तिथे 2-3 पाकिस्तानी लोक होते. जे हिंदुस्तान मुर्दाबाद आणि काश्मीरबद्दल बोलत होते. मी माझ्या देशाबद्दल किंवा देशाविरुद्ध काहीही ऐकू शकत नाही. तुम्ही मला वैयक्तिकरित्या शिवीगाळ केलीत तर मी हसत हसत निघून जाईन असे तुम्हाला वाटते का? मी तसा नाही. सामना बघायला आला असाल तर आपल्या देशाला साथ द्या. यात राजकीय काहीही करू नका," असंही गंभीरने म्हटलं आहे.