CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या (CWG 2022) उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-0 असा पराभव केला. मात्र या पराभवानंतर वाद सुरु झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. भारतीय हॉकी संघाची कर्णधार सविताने चतुराईने ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊट रोखला, पण घड्याळ सुरू झाले नसल्याचे सांगत पंचांनी तो अवैध ठरवला. 


कॉमनवेल्थ खेळांसारख्या मोठ्या स्पर्धेत एवढा बेफिकीरपणा तोही इतक्या महत्त्वाच्या सामन्यात, तो कुणाच्याच पचनी पडलेला नाही. त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी ऑस्ट्रेलियाचा संघ चुकीच्या पद्धतीने विजयी झाला असे म्हटले आहे.


या वादग्रस्त पेनल्टी शूटचा व्हिडिओ सेहवागने ट्विटरवर शेअर केला आहे. पेनल्टी शूट ऑस्ट्रेलियाकडून हुकले आणि पंचांनी म्हटले की, सॉरी घड्याळ सुरू झाले नाही. क्रिकेटमध्येही असे घडत होते, जोपर्यंत आपण महासत्ता बनलो नाही. हॉकीमध्येही आम्ही लवकरच तयार होऊ आणि मग सर्व घड्याळे वेळेवर सुरू होतील, मला माझ्या मुलींचा अभिमान आहे, असे सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



नेमकं घडलं काय?
पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिला प्रयत्न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाच्या रोझी मॅलोनला स्कोअरबोर्डवर आठ सेकंदांचे काउंटडाउन सुरू न झाल्याने तिला आणखी एक संधी देण्यात आली. दुसऱ्या संधीत  मॅलोनने आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.


त्यानंतर इंग्लंडचे अधिकारी बी मॉर्गन यांच्या निर्णयामुळे भारतीय चाहते संतापले होते. शूटआउटमध्ये प्रत्येक खेळाडूला चेंडू नेटमध्ये टाकण्यासाठी आठ सेकंद मिळतात. मॅलोनला दुसरी संधी मिळाल्यानंतर भारतीय संघाने लय गमावली आणि पहिल्या तीन प्रयत्नात गोल करण्यात अपयश आले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने सर्व संधी हेरल्या.