`कुंबळेने निवड समिती अध्यक्ष व्हावं`; सेहवागची इच्छा
टीम इंडियाच्या निवड समितीचा पुढचा अध्यक्ष कोणं व्हावं? असा प्रश्न सेहवागला विचारण्यात आला.
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या निवड समितीचा पुढचा अध्यक्ष कोणं व्हावं? असा प्रश्न सेहवागला विचारण्यात आला. तेव्हा अनिल कुंबळेने ही जबाबदारी सांभाळावी, असं उत्तर सेहवागने दिलं. अनिल कुंबळे टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधला टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर होता. कुंबळेने टेस्टमध्ये ६१९ विकेट आणि वनडेमध्ये ३३४ विकेट घेतल्या.
सेहवागने द सिलेक्टर ऍप लॉन्चच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. निवड समिती अध्यक्ष बनण्याबाबत सेहवागला प्रश्न विचारण्यात आला. 'निवड समिती अध्यक्ष होण्यासाठी अनेक सीमा आहेत. तुम्ही कॉमेंट्री करु शकत नाही किंवा स्तंभलेखनही करु शकत नाही. त्यामुळे मी निवड समिती अध्यक्ष व्हायचा विचार केला नाही,' असं सेहवाग म्हणाला.
'कुंबळे हा निवड समितीचा अध्यक्ष होण्यासाठी योग्य उमेदवार हे. तो कर्णधार होता, तेव्हा माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, जर खेळतोस तसाच खेळ कारण पुढच्या २ सीरिजआधी तुला टीममधून काढणार नाही. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. निवड समितीचा अध्यक्ष असाच असायला पाहिजे,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.
कुंबळे २००७-०८ साली टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता. २०१६-१७ साली कुंबळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकही होता. पण २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर विराट आणि कुंबळेमध्ये वाद झाले, यानंतर कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला.
'मी कधीही टीमचा प्रशिक्षक व्हायचा विचार केला नाही. त्यामुळे अर्जही केला नाही. मागच्यावेळी बोर्डाच्या सचिवांनी मला अर्ज करायला सांगितला, म्हणून मी अर्ज केला होता आणि त्यावेळी मुलाखतीलाही गेलो होतो. यावेळी कोणीही मला अर्ज करायला सांगितला नाही, त्यामुळे मी केला नाही,' असं सेहवागने सांगितलं.
परस्पर हितसंबंधांच्या मुद्दयावरही सेहवागने भाष्य केलं. हितसंबंधांचा हा मुद्दा माझ्या आकलनापलीकडचा आहे. एका खेळाडूवर प्रत्येक बाबतीत निर्बंध आणणं किती योग्य आहे? जर कोणी क्रिकेट अकादमी चालवत असेल, तर त्याने निवड समिती अध्यक्ष बनू नये, हा नियम योग्य आहे कारण तुम्हाला टीमची निवड करायची आहे. पण तो प्रशिक्षक का बनू शकत नाही? प्रशिक्षक तर निवडलेल्या टीमसोबत काम करतो. यामध्ये हितसंबंध कुठे येतात? असे प्रश्न सेहवागने विचारले.