सरावातच अग्नीपरीक्षा! भारताचा सामना World Cup मधून बाहेर फेकणाऱ्या `दादा` संघाशी; पाहा शेड्यूल
Warm Up Matches ICC Men Cricket World Cup 2023: भारतामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याच स्पर्धेआधीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं असून भारत 2 सराव सामने खेळणार आहे.
Warm Up Matches ICC Men Cricket World Cup 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने भारतामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेसंदर्भातील सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेत खेळण्याआधी 2 सराव सामने खेळेल हे या वेळापत्रकामधून स्पष्ट झालं आहे. भारताचा पहिला सराव सामना ऑस्ट्रलियाविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेनंतर अवघ्या 3 दिवसांनी आहे. एक सामना जागतिक विजेत्या संघाविरोधात आहे.
कधी आणि कोणाविरुद्ध होणार भारताचे समाने?
भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणाऱ्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी प्रत्येक संघाला 2 सराव सामने खेळता येणार आहे. आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या वॉर्मअप शेड्यूलमध्ये याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 23 ऑगस्टच्या या पोस्टमध्ये भारतीय संघ 30 सप्टेंबर रोजी पहिला सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना भारत इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीच्या मैदानात खेळणार आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने मानहानीकारक पराभव केला होता. या पराभवासहीत भारत स्पर्धेतून बाहेर पडला होता. भारताचा दुसरा सराव सामना नेदरलॅण्डविरुद्ध 3 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे हे दोन्ही सामने दुपारीच खेळवले जातील. दुपारी 2 वाजता या सामन्यांना सुरुवात होईल.
सर्व संघ एकमेकांविरोधात खेळणार
भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. हे सामने राउंड रॉबिन फॉरमॅट पद्धतीने खेळवले जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ अन्य 9 संघांविरोधात सामने खेळणार. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा विश्वचषक स्पर्धेतील सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत या मालिकेआधी 30 ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेमध्ये आशियामधील 6 देश सहभागी झाले आहेत.
सराव सामन्यांच्या तारखा आणि संघ खालीलप्रमाणे:
29 सप्टेंबर: बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका, गुवाहाटी
29 सप्टेंबर: दक्षिण अफ्रीका विरुद्ध अफगानिस्तान, तिरुवनंतपुरम
29 सप्टेंबर: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, हैदराबाद
30 सप्टेंबर: भारत बनाम इंग्लंड, गुवाहाटी
30 सप्टेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलॅण्ड, तिरुवनंतपुरम
2 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश, गुवाहाटी
2 ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रीका, तिरुवनंतपुरम
3 ऑक्टोबर: अफगानिस्तान विरुद्ध श्रीलंका, गुवाहाटी
3 ऑक्टोबर: भारत विरुद्ध नेदरलॅण्ड, तिरुवनंतपुरम
3 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, हैदराबाद