वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने पराभूत करत वर्ल्डकपमध्ये हरवण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला होता. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत तोंडचा घास हिरावून घेतला. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दोन्ही देशाचे चाहते एकमेकांचा पराभव साजरा करताना दिसत होते. यावरुन वसीम अक्रम आणि गौतम गंभीरने नाराजी जाहीर केली असून अशा कृत्यांमध्ये सहभागी न करण्याचं आवाहन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ज्याप्रकारे भारत आणि पाकिस्तान एकमेकांचा पराभव साजरा करत आहेत ते पाहून मला एकच म्हण आठवत आहे, 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना'. मी कोणाचं नाव घेत नाही, पण दोन्ही देशात असे काही प्रसिद्ध लोक आहेत जे अशा कृत्यांना हातभार लावत असतात. तुम्ही तुमच्या देशासाठी देशभक्त आहात आणि आम्ही आमच्या देशासाठी आहोत. इथेच हा विषय संपवा. प्रत्येकजण संघर्ष करत असताना एकमेकांशी चांगलं वागा. दिवसाच्या शेवटी हा फक्त एक खेळ आहे," असं वसीम अक्रमने स्पोर्ट्सक्रीडाशी बोलताना म्हटलं. 


गौतम गंभीरनेही वसीम अक्रमप्रमाणेच भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानचा पराभव भारताने साजरा करणं आणि याउलट होणं हे फार विचित्र असल्याचं गंभीर म्हणाला आहे. 


"दुसऱ्या देशाच्या पराभवाचा आनंद लुटण्यापेक्षा तुमच्या देशाचा विजय साजरा करण्यावर लक्ष द्या. इतर देशाचा पराभव साजरा करण्याला काही अर्थ नाही. जेव्हा पाकिस्तानचा पराभव होतो तेव्हा भारतातील लोक आनंदी होतात आणि जेव्हा भारत हारतो तेव्हा पाकिस्तानातही अशीच स्थिती असते. हा फार नकारात्मक विचार आहे. किमान खेळात तरीतुम्ही तुमचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे," असं गौतम गंभीर म्हणाला आहे.


"दुसऱ्यांच्या दु:खात नव्हे तर स्वतःच्या सुखात आनंद शोधा. त्याचा काय फायदा होतो? एखाद्या खेळाडूने असा विचार करू नये. सोशल मीडियावर फक्त इतरांचं लक्ष आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी लोकांनी अशा गोष्टी करायला सुरुवात केली आहे," अशी टीका गौतम गंभीरने केली आहे. 


"काही महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान टी-20 मध्ये एकमेकांशी भिडणार आहे. आपण सांगू शकत नाही, पण कदाचित ते अंतिम सामन्यातही भिडू शकतात. पण म्हणून पाकिस्तान हारल्यानंतर भारतीयांना आनंद होण्याचं कारण नाही. किंवा भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सेलिब्रेशन करण्याची गरज नाही. दोन्ही संघांसमोर आपापली आव्हानं आहेत," असंही त्याने सांगितलं.