९ रणजी फायनलमध्ये ९ विजय, वसीम जाफरचं जबरदस्त रेकॉर्ड
विदर्भानं पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला.
इंदूर : विदर्भानं पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. विदर्भाच्या या यशामध्ये महत्त्वाचा वाटा बजवाला तो वसीम जाफरनं. यंदाच्या सिझनमध्ये विदर्भाकडून खेळताना जाफरनं जवळपास ६०० रन्स बनवल्या. जाफरनं आत्तापर्यंत ९ रणजी फायनल खेळल्या आहेत, यापैकी सगळ्या ९ रणजी फायनल जिंकणाऱ्या टीमचा जाफर हिस्सा होता.
१९९६-९७मध्ये जाफरनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर १९ सिझन जाफर मुंबईकडून खेळला. यंदा मात्र जाफरनं विदर्भाकडून रणजी खेळला. दिल्लीविरुद्धच्या रणजी फायनलमध्ये जाफरनं पहिल्या इनिंगमध्ये ७८ रन्स आणि शेवटच्या इनिंगमध्ये नाबाद १७ रन्स करून विदर्भाचा विजय निश्चित केला.
रणजी क्रिकेटमध्ये वसीम जाफर हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. जाफरनं १३८ मॅचमझ्ये ५६.८१च्या सरासरीनं १०,७३८ रन्स बनवल्या आहेत. यामध्ये ३६ शतकं आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अयशस्वी
प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवणाऱ्या वसीम जाफरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फारसं यश मिळालं नाही. २००० साली भारतीय टीमध्ये आगमन करणाऱ्या जाफरनं ३१ टेस्टमध्ये १,९४४ रन्स बनवल्या. यामध्ये ५ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर २००२साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी पुन्हा एकदा जाफरचं टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं. यावेळीही पदरात अपयश आल्यामुळे जाफरला पुन्हा डच्चू मिळाला.
२००५-०६मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये जाफरला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. इंग्लंडविरुद्धच्या नागपूर टेस्टमध्ये जाफरनं शतक झळकवलं तर जून २००६मध्ये जाफरनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये द्विशतक केलं.
कामगिरीमध्ये सातत्य नसल्यामुळे जाफरला पुन्हा एकदा टीममधून डच्चू देण्यात आला आणि गौतम गंभीरला संधी देण्यात आली. २००८-०९च्या रणजी सिझनमध्ये त्रिशतक झळकवलं. याच सिझनमध्ये जापरनं १,२६० रन्स केले होते. जाफरच्या नेतृत्वात मुंबईनं दोन रणजी ट्रॉफी जिंकल्या आहेत.