VIDEO: १७ वर्षांच्या जेमिमाने घेतली जबरदस्त कॅच, सचिन तेंडुलकरनेही केलं कौतुक
महिला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिज जिंकली आणि एक नवा इतिहास रचला. क्रिकेटच्या इतिहासात महिलांची ही पहिली टीम बनली आहे ज्या टीमने आफ्रिकेला एकाच टूरमधल्या दोन सीरिजमध्ये पराभूत केलं आहे.
केपटाऊन : महिला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिज जिंकली आणि एक नवा इतिहास रचला. क्रिकेटच्या इतिहासात महिलांची ही पहिली टीम बनली आहे ज्या टीमने आफ्रिकेला एकाच टूरमधल्या दोन सीरिजमध्ये पराभूत केलं आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
याच सीरिजमधील शेवटच्या मॅचमधील एका कॅचने सर्वच दिग्गजांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही कॅच घेतली आहे महिला टीम इंडियाच्या जेमिमा रॉड्रिग्जने.
या मॅचमध्ये जेमिमा रॉड्रिग्जने केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. जेमिमाने केलेल्या बॅटिंगनेच नाही तर फिल्डिंगनेही सर्वांची मनं जिंकली आहेत.
मॅचमध्ये १६७ रन्सचं आव्हान गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकन टीम मैदानात उतरली होती. १७व्या ओव्हरमध्ये आफ्रिकेचा स्कोअर ७ विकेट्सवर १०७ रन्स होता. क्रिजवर मारीजेन आणि मसाबाता खेळत होत्या.
१७व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर मारीजेनने मिडविकेटवर सिक्सर शॉट खेळला. सर्वांनाच वाटलं की सिक्सर जाईल पण, भारतीय टीमच्या जेमिमाने बाऊंड्रीवर जबरदस्त कॅच पकडत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
जेमिमाने केवळ कॅच पकडली नाही तर, आपलं संतुलन कायम ठेवत पाय बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापासून रोखला. ही कॅच सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असून कॅचचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
ही कॅच पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही प्रभावित झाला आणि सचिननेही ट्विटरवर जेमिमाचं कौतुक केलं आहे.