Shaheen Shah Afridi In The Hundred​: पाकिस्तानचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने द हंड्रेड या क्रिकेट स्पर्धेमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. या स्पर्धेमध्ये पदार्पण करताना आपल्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आहेत. मँचेस्टर ओरिजनल्सच्या दोन्ही फलंदाजांना शाहीनचे यॉर्कर समजलेच नाहीत. शाहीनने सामन्याच्या सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संघाला 2 धक्के दिल्याने त्याच्या वेल्स फायर संघाला या सामन्यात विजय मिळवणं सोपं झालं. 


शाहीन शाह आफ्रिदीची लोकप्रियता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 च्या द हंड्रेडच्या लिलावामध्ये दुसरी सर्वाधिक बोली लागलेला शाहीन शाह आफ्रिदी पदार्पण करेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती. मागील काही वर्षांमध्ये शाहीन शाह आफ्रिदी हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. शाहीनचे चेंडू इन आणि आऊट स्वींग होताना पहाणं पर्वणी असते असं त्याचे चाहते सांगतात. शाहीन शाह आफ्रिदीची ओळख 'बेस्ट इन द बिझनेस' म्हणजेच जे करतो ते अगदी उत्तम दर्जाचं करतो अशी आहे. शाहीनची लोकप्रियता एवढी का आहे आणि त्याच्या गोलंदाजीची एवढी चर्चा का आहे याची प्रचिती 'द हंड्रेड'च्या चाहत्यांना शाहीनने टाकलेल्या पहिल्या 2 चेंडूंमध्येच आली.


दोन चेंडूत दोघे तंबूत


मँचेस्टर ओरिजनल्स विरुद्ध वेल्स फायरचा सामना पावसामुळे प्रत्येकी 40 चेंडूंचा खेळवण्यात आला. या सामन्यात वेल्स फायरला 95 धावांपर्यंत मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करणाऱ्या मँचेस्टरच्या संघाकडून इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट मैदानात उतरला. या 26 वर्षीय खेळाडूची खेळी अवघ्या एका चेंडूत संपली. शाहीन शाह आफ्रिदीने टाकलेला यॉर्कर लेंथ चेंडू अगदी फिलच्या पायाजवळ पडला आणि त्याच्या उजव्या पायावरील पॅडला लागला. पंचांनी फिलला बाद घोषित केलं. त्यानंतरचा चेंडू हा पाहिल्या चेंडूपेक्षा भन्नाट होता. लॉरी इव्हान्सही पहिल्या चेंडूतच तंबूत परतला. शाहीनने टाकलेला यॉर्कर लॉरीला खेळताच आला नाही.  


नंतर झाली धुलाई


10 चेंडूंचं षटक या पद्धतीने प्रत्येक सामन्यातील एका डावात 100 चेंडूंचा खेळ या द हंड्रेड नावाच्या स्पर्धेत खेळला जातो. शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या षटकाची दमदार सुरुवात केली. मात्र या षटकातील शेवटच्या 6 चेंडूंपैकी 5 चेंडूंवर शाहीन शाह आफ्रिदीला चौकार लगावले. मँचेस्टरच्या संघाकडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या मॅक्स होल्डनने शाहीन शाह आफ्रिदीला पुढील 6 चेंडूंमध्ये 5 चौकार लगावले. 



मागच्या वर्षी भोपळाही फोडला नाही यंदा चांगली सुरुवात


मात्र मँचेस्टरच्या संघाला केवळ 85 धावांपर्यंत मजल मारता आली आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या संघाने सामना 9 धावांनी जिंकला. मागील वर्षी शाहीन शाह आफ्रिदीचा वेल्स फायर संघाला एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यांना 8 पैकी 8 ही सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं.