लंडन : रविवारी पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या संघांमधील सामन्यात भारतीय क्रिकेट संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाबतीत या संघाची कामगिरी क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून गेली. या साऱ्यात विशेष चर्चिली ती म्हणजे संघातील फलंदाजांची फटकेबाजी. शिखर धवनच्या शतकी खेळीसोबतच विराटची फटकेबाजीसुद्धा गाजली. यात धोनीची १४ चेंडूंमधील २७ धावांची खेळीही महत्त्वाची ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया संघापुढे ३५२ धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंह धोनी याने २७ धावांचं योगदान दिलं. धोनीचं नुसतं मैदानात येणंच क्रीडारसिकांसाठी अतीव महत्त्वाचं असतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही हेच दृश्य पाहायला मिळालं. ज्यामध्ये धोनीचे काही तुफानी फटके पाहून कर्णधार विराट कोहलीही अवाक् झाला. 'हॅलिकॉप्टर शॉट'सारख्या किमया करणाऱ्या माहिने या सामन्यातही एक असा षटकार लगावला जो पाहता, विराटही स्वत:ची प्रतिक्रिया रोखू शकला नाही. 



४९ व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून गोलंदाजी करणाऱ्या मिशेल स्टार्क याने १४३ किमी प्रतितास वेगाने चेंडू धोनीच्या दिशेने टाकला. धोनीला बाद करण्याच्या हेतूने टाकण्यात आलेल्या या चेंडूला धोनीने मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जोरदार फटका मारत सामना पाहण्यासाठी आलेल्य़ा क्रीडारसिकांच्या दिशेने भिरकावला. 



धोनीने मारलेला षटकार आणि तो मारतानाचा त्याचा अंदाज पाहता विराटही काही क्षणांसाठी अवाक् झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने याविषयी धोनीला शुभेच्छाही दिल्या. माहिचा हा षटकार पाहताच समालोचकांनीही अशा काही प्रतिक्रिया दिल्या जे पाहता, खरंच टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्येही चर्चा होती ती म्हणजे फक्त आणि फक्त माहीचीच.